मुंबई : येत्या काही दिवसांत उत्तर-पश्चिम भारतातील अनेक भागांत पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, पश्चिम हिमालयाच्या भागातही जोरदार हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, 24 ते 26 जानेवारी दरम्यान डोंगराळ भागात हिमवृष्टी आणि मैदानी भागांत मुसळधार पाऊस पडणार आहे.
आजपासून पुढील 4 दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुसळधार पावसानानंतर थंडी पुन्हा एकदा वाढणार असल्याचेही हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. पावसाच्या वातावरणामुळे थंडीपासून काही काळ दिलासा मिळू शकतो.
उत्तर भारतातील पर्वतांपासून ते मैदानी प्रदेशापर्यंत थंडीचा कहर सुरु आहे. मात्र तापमानात बदल झाल्याने काही प्रमाणात येथील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. आजपासून पुन्हा हवामान बदलणार असल्याने थंडी आणखी कमी होण्याची शक्यता आहे.
काही भागात बर्फवृष्टी सुरु आहे. जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या पर्वतांवर गेल्या अनेक दिवसांपासून बर्फवृष्टीसह पाऊस पडत आहे. 23 ते 26 जानेवारी दरम्यान बर्फवृष्टीसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
23 जानेवारी रोजी पंजाब, हरियाणा, चंदीगड, महाराष्ट्र, दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. 24 जानेवारीला मेघगर्जनेसह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, 24 तारखेला जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट, बाल्टिस्तान, मुझफ्फराबादमध्ये बर्फवृष्टी होऊ शकते. यादरम्यान, उत्तर राजस्थान आणि मध्य प्रदेशात हलक्या पावसाची शक्यता आहे.