China Hydro Power Project : भारताचा शेजारी आणि जगालाच तापदायक ठरणारे उपदव्याप करणारा चीन कधी काय करील याचा नेम नाही. देशांना कर्जाच्या सापळ्यात अडकवायचं. जमिनींवर कब्जा करायचा, शेजारी देशांना विनाकारण त्रास द्यायचा असे अनेक प्रकार चीनी राज्यकर्ते करत असतातच. भारताला टार्गेट करण्याचेही प्रकार सुरुच आहेत. यातच आता आणखी एक धक्कादायक बातमी आली आहे. ज्यामुळे भारताची डोकेदुखी निश्चितच वाढणार आहे. चीन भारताच्या अडचणी वाढतील असं नेमकं करतोय तरी काय? याचीच माहिती घेऊ या..
खरंतर चीन जगातील सर्वात मोठं धरण (डॅम) बांधण्याच्या कामात गुंतला आहे. चीनचा हा निर्णय असला तरी यामुळे भारताची धाकधूक वाढणार आहे. कारण हा प्रकल्प भारतीय हद्दीजवळ बह्मपुत्र नदीवर (चीनी भाषेत यारलुंग जांगबो नदी) होणार आहे. चीनने या प्रकल्पाला पृथ्वीवरील सर्वात मोठा प्रोजेक्ट असं नाव दिलं आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी तब्बल तीन हजार अब्ज रुपये इतका खर्च येणार आहे. हे धरण भारताच्या सीमेजवळ तिबेटमध्ये केले जाणार आहे. यामुळे फक्त भारत नाही तर बांग्लादेशचीही डोकेदुखी वाढणार आहे.
चीनची सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआने जिनिपिंग सरकारचे एक अधिकृत निवेदन शेअर केले आहे. ब्रह्मपुत्र नदीवर बांधण्यात येणाऱ्या हायड्रो पावर प्रोजेक्टला ग्रीन सिग्नल मिळाला आहे. हा प्रकल्प थ्री गॉर्जिज धरणापेक्षाही मोठा आहे. हा धरण प्रकल्प आजमितीस जगात सर्वात मोठा आहे. परंतु, नवीन धरण ज्यावेळी अस्तित्वात येईल तेव्हा हेच धरण जगात सर्वात मोठ्या धरणाचा मान मिळवील. या प्रकल्पातून तिबेटमधील नागरिकांना रोजगार मिळण्याचा दावा चीनने केला आहे. पॉवर कंस्ट्रक्शन कॉर्प ऑफ चायनाने 2020 मध्ये दिलेल्या माहितीनुसार यारलुंग जांग्बो (ब्रह्मपुत्र नदी) नदीच्या खालच्या भागात हे धरण बांधण्यात येणार आहे. या माध्यमातून दरवर्षी साधारण 300 बिलियन KWH वीज निर्मिती करण्याची क्षमता मिळणार आहे.
मोठी बातमी! जपान एअरलाइन्सवर सायबर हल्ला, विमानसेवा विस्कळीत; प्रवासी ताटकळले
चीन इतका प्रोजेक्ट हातात घेतोय त्यावर प्रचंड पैसाही खर्च करतोय म्हटल्यावर यामागे काहीना काही उद्देश नक्कीच असणार. त्यातही चीनची प्रकृती पाहिली तर आधी स्वतःचा स्वार्थ असतो. दुसऱ्या देशांना त्रास होईल अशी मानसिकताही असते. मग या प्रकल्पातही असे काही आहे का असा प्रश्न विचारला तर याचं उत्तर होय असंच येतंय.
या प्रोजेक्टमुळे भविष्यात भारताच्या अडचणी नक्कीच वाढणार आहेत. चीन या धरणाचा उपयोग हायड्रोपावरसाठी तर करणारच पण याचा वापर एक हत्यार म्हणूनही करण्याची शक्यता नाकारता येत नाही. जसे की भविष्यात जर दोन्ही देशांत तणाव वाढला तर चीन या धरणाच्या मदतीने भारताच्या सीमावर्ती राज्यांत अतिरिक्त पाणी सोडू शकतो. यामुळे या राज्यात पूर परिस्थिती निर्माण होईल.
सीमेपलीकडील नद्यांच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी दोन्ही देशांनी सन 2006 मध्ये एक्सपर्ट लेव्हल मॅकेनिजमची स्थापना केली होती. यानुसार पूर परिस्थिती निर्माण झाल्यास चीन भारताला ब्रह्मपुत्र आणि सतलज नदीवर वॉटर सायंस बाबतीत माहिती देत असतो. भारत आणि चीनच्या विशेष प्रतिनिधींची एक बैठक १८ डिसेंबर रोजी झाली होती. या बैठकीत भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी सीमेपलीकडील नद्यांची माहिती देण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. पण, भारतानेही भविष्यातील असे धोके ओळखून अरुणाचल प्रदेशात एका धरणाच्या निर्मितीला सुरुवात केली आहे.
चीन हे धरण हिमालय पर्वताच्या क्षेत्रात बनवण्याच्या योजनेवर काम करत आहे. ज्या भागातून ब्रह्मपुत्र नदी अरुणाचल प्रदेशात प्रवेश करण्याआधी वेगाने फिरते आणि बांग्लादेशातून वाहण्यास सुरुवात करते त्या ठिकाणी धरण बांधले जाणार आहे. यामुळे नदीच्या प्रवाहावर चीनचे नियंत्रण स्थापित होईल तसेच भारतीय राज्यांत पूर येण्याचा धोका वाढणार आहे. त्यामुळे भारताने चीनच्या या प्रोजेक्टवर चिंता व्यक्त केली आहे.
अमेरिका, युरोप, नाटो अन् एक टीव्ही शो.. युक्रेन-रशिया युद्धाचं नेमकं कारण तरी काय?
एका रिपोर्टनुसार चीनच्या या धरणामुळे पर्यावरणाच्या दृष्टीने अनेक दुष्परिणाम संभवू शकतात. वैज्ञानिकांचं म्हणणं आहे की या धरणामुळे पर्यावरणाचं नुकसानच होणार आहे. भूकंप आणि पूर येण्याचा धोका वाढणार आहे. चीनच्या थ्री गॉर्जेस डॅमवरूनही नासाचे वैज्ञानिक बेंजामिन फोंग चाओ यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते. या धरणामुळे पृथ्वीच्या फिरण्याच्या वेगाबरोबरच ग्रहाच्या स्थितीही प्रभावित होऊ शकते. चीन जगातील सर्वात मोठे धरण बांधत आहे म्हटल्यानंतर हा प्रभाव अधिक होण्याची शक्यता आहे.