China Nuclear Powered Tank Railgun Intent : चीन अत्याधुनिक रणगाडा (Tank) बनवत आहे. विशेष म्हणजे हा रणगाडा अणुऊर्जेवर चालणारा विकसित करण्याची संकल्पना मांडलीय. सुमारे 60 टन वजनाच्या या प्रस्तावित रणगाड्यात इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेलगन बसवण्यात येणार आहे. या रेलगनमधून डागण्यात येणारा गोळा तब्बल 3.5 किलोमीटर प्रति सेकंद वेगाने प्रवास करू शकतो. सुमारे 450 किलोमीटरपर्यंतच्या लक्ष्यावर मारा करण्याची क्षमता त्यात असणार आहे.
चीनच्या ‘सुपर टँक’ची संकल्पना
चिनी लष्करी संशोधकांनी 60 टन वजनाच्या अणुऊर्जेवर चालणाऱ्या मुख्य युद्धक रणगाड्याची संकल्पना मांडलीय. या रणगाड्यात इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेलगनचा वापर केला जाणार आहे. ही रेलगन अत्यंत वेगाने आणि मोठ्या अंतरावरील लक्ष्यांवर गोळे डागण्यास सक्षम असल्याचा दावा संशोधनात करण्यात आलाय. प्रस्तावित रणगाड्याचा गोळा 3.5 किलोमीटर प्रति सेकंद म्हणजेच सुमारे मॅक 10.2 इतक्या वेगाने प्रवास करू शकतो. भारत आणि चीनची लांब भूसीमा आहे. अशा प्रकारच्या लष्करी तंत्रज्ञानाच्या विकासाकडे भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही लक्ष वेधले जात आहे. मात्र हा रणगाडा सध्या संकल्पना आणि संशोधनाच्या टप्प्यावर आहे.
‘न्यूक्लियर टँक’ची संकल्पना कुठे मांडली?
चीनच्या या अणुऊर्जेवर चालणाऱ्या रणगाड्याची संकल्पना ‘Acta Armamentarii’ या संरक्षणविषयक नियतकालिकात प्रकाशित करण्यात आली आहे. इनर मंगोलिया फर्स्ट मशिनरी ग्रुप आणि बीजिंग इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या संशोधकांनी हे संशोधन केले आहे.
इनर मंगोलिया फर्स्ट मशिनरी ग्रुप ही चीनच्या बख्तरबंद वाहनांच्या संशोधन आणि विकासाशी संबंधित संस्था आहे. या संशोधन प्रकल्पाला ‘National Key Laboratory of Special Vehicle Design and Manufacturing Integration Technology’कडून निधी मिळाल्याचे सांगण्यात आले आहे.
इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेलगन इतक्या वेगाने गोळा कशी डागते?
सध्याच्या पारंपरिक रणगाड्यांमध्ये धातूचे गोळे पुढे ढकलण्यासाठी बारूदाचा वापर केला जातो. या गोळ्याचा प्रारंभिक वेग साधारणपणे 1.7 ते 2.0 किलोमीटर प्रति सेकंदाच्या आसपास मर्यादित राहतो. पण इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेलगनमधून रासायनिक बारुदापेक्षा विद्युतचुंबकीय शक्तीचा वापर केला जातो. अत्यंत मोठ्या प्रमाणात विद्युत प्रवाह निर्माण करून गोळ्याला बॅरलमधून प्रचंड वेगाने बाहेर ढकलले जाते. त्यामुळे तुलनेत अधिक वेग मिळवणे शक्य होते.
चीनच्या प्रस्तावित रणगाड्याची वैशिष्ट्ये काय?
चीनच्या संशोधनात सुमारे 60 टन वजनाच्या मुख्य युद्धक रणगाड्याच्या चेसिसवर तब्बल 50 मेगाजूल क्षमतेची इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेलगन बसवण्याची संकल्पना मांडण्यात आली आहे. या रेलगनच्या गोळ्याचा प्रारंभिक वेग सुमारे 3.5 किलोमीटर प्रति सेकंद, म्हणजेच जवळपास 12,600 किलोमीटर प्रतितास किंवा मॅक 10.2 इतका असू शकतो. या रणगड्याची सैद्धांतिक मारक क्षमता सुमारे 450 किलोमीटर असल्याचे संशोधनात नमूद करण्यात आले आहे.
गोळ्याचा वेग अत्यंत जास्त असल्यामुळे लक्ष्यावर आदळताना त्यातून मोठ्या प्रमाणात गतिज ऊर्जा निर्माण होऊ शकते. त्यामुळे अशा प्रक्षेपकाचा वापर जड मिश्रित कवच, काँक्रीटचे बंकर आणि भूमिगत संरचनांविरुद्ध केला जाऊ शकतो, असा संशोधनातील दावा आहे.
मात्र, हे अद्याप प्रत्यक्ष रणगाडे नाही
चीनने मांडलेली ही संकल्पना सध्या संशोधन आणि तांत्रिक प्रस्तावाच्या स्वरूपात आहे. त्यामुळे 450 किलोमीटरची मारक क्षमता किंवा 3.5 किलोमीटर प्रति सेकंदाचा वेग प्रत्यक्ष रणगाड्यात साध्य झाला आहे, असे समजणे योग्य ठरणार नाही. या तंत्रज्ञानाच्या प्रत्यक्ष विकासासाठी ऊर्जा पुरवठा, रेलगनची कार्यक्षमता, वजन, उष्णता व्यवस्थापन आणि रणांगणावरील वापर यांसारखी अनेक तांत्रिक आव्हाने आहेत.
