नवी दिल्ली : गुजरात दंगलीवर आधारित असलेली बीबीसीची (BBC) ‘इंडिया: द मोदी क्वेश्चन’ डॉक्युमेंट्री (‘India: The Modi Question’ Documentary) वादात सापडली आहे. केंद्र सरकारने यूट्यूबवरील व्हिडिओ आणि ट्विटर लिंक ब्लॉक केल्या आहेत. असे असताना देखील दिल्लीतील जेएनयू कॅम्पसमध्ये डॉक्युमेंटरीच्या स्क्रीनिंग ठेवण्यात आली होती.
यावरुन दिल्लीतील जेएनयू कॅम्पसमध्ये डॉक्युमेंटरीवरून राडा झाला आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (JNU) विद्यार्थ्यांनी मंगळवारी (24 जानेवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील बीबीसीच्या डॉक्युमेंटरीच्या स्क्रीनिंगची घोषणा केली. मात्र, या स्क्रीनिंगपूर्वीच विद्यार्थी संघटनेच्या कार्यालयातील वीज खंडित करण्यात आली आहे.
यासोबतच विद्यार्थ्यांवर दगडफेक केल्याचा दावा देखील केला जात आहे. अभाविप आणि डाव्या विद्यार्थ्यांमध्ये दगडफेक झाल्याचे सांगितले जात आहे. यासोबतच इंटरनेटही बंद करण्यात आले आहे.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा आयशा घोष यांनी दावा केला की, जेएनयू प्रशासनाने वीज खंडित केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डॉक्युमेंट्रीचे स्क्रीनिंग रात्री 9 वाजता सुरू होणार होते आणि प्रशासनाकडून परवानगी मिळाली नाही, त्याला न जुमानता विद्यार्थ्यांनी स्क्रिनिग करण्याचे नियोजन केले होते. जेएनयू प्रशासनाने या स्क्रीनिंगला परवानगी दिली नाही. तसेच डॉक्युमेंट्रीच्या स्क्रीनिंगनंतर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असेही सांगितले.
दरम्यान विद्यार्थ्यांनी परवानगीशिवाय डॉक्युमेंट्री दाखवल्याची बाब समोर येताच प्रशासनाने विद्यार्थी संघटनेच्या कार्यालयाची वीज आणि इंटरनेट सेवा बंद केली. मात्र, असे असतानाही विद्यार्थ्यांच्या वतीने डॉक्युमेंट्री दाखवण्यात आला.
बीबीसीच्या ‘इंडिया: द मोदी क्वेश्चन’ या डॉक्युमेंट्री सीरीजवरून वाद पेटला आहे. ही सीरीज भारतात उपलब्ध नाही, पण त्याच्या लिंक्स यूट्यूब आणि ट्विटरवर शेअर करण्यात आल्या आहेत. तसेच परराष्ट्र मंत्रालयाने हा डॉक्युमेंट्री अप्रचाराचा भाग असल्याचे म्हटले आहे.