Cyber Attack Disrupts Flights At London : सायबरहल्ल्याने युरोपातील विमानतळे विस्कळीत झाली आहेत. हिथ्रो, ब्रुसेल्स, बर्लिनमध्ये प्रवाशांची मोठी गैरसोय झाल्याचं समजतंय. आज युरोपातील काही प्रमुख विमानतळांवर मोठ्या प्रमाणावर गोंधळ उडाला. चेक-इन आणि बोर्डिंग सिस्टम चालवणाऱ्या सेवा पुरवठादारावर झालेल्या सायबरहल्ल्यामुळे हजारो प्रवाशांना उशीर, तसंच अनेक उड्डाणं रद्द होण्याचा सामना करावा लागला.
लंडनचं हिथ्रो, बेल्जियमचं ब्रुसेल्स आणि जर्मनीचं बर्लिन (Cyber Attack) विमानतळ या घटनेमुळे सर्वाधिक प्रभावित झाले. या प्रणालीचं संचालन करणाऱ्या कोलीन्स अॅरोस्पेस या कंपनीनं सायबरहल्ल्यानंतर तांत्रिक अडचणी सुरू असल्याची माहिती दिली आहे. हिथ्रो विमानतळानं प्रवाशांना आगाऊ सतर्क केलं असून, उड्डाणांच्या (Flights) वेळेत बदल होऊ शकतो, म्हणून प्रवाशांनी आपले फ्लाइट स्टेटस तपासत राहावं, असं आवाहन (European Airports) केलं आहे.
दरम्यान, ब्रुसेल्स विमानतळावर स्वयंचलित चेक-इन आणि बोर्डिंग सेवा ठप्प झाल्यामुळे कर्मचाऱ्यांना हाताने प्रक्रिया करावी लागली. त्यामुळे उड्डाणांच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम झाला असून उशीर आणि उड्डाण रद्द होण्याची शक्यता (London) वर्तवण्यात आली आहे. “सेवा पुरवणारी कंपनी तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करत आहे, असं विमानतळ प्रशासनानं स्पष्ट केलं. प्रवाशांनी प्रवासाला निघण्यापूर्वी आपल्या एअरलाईनकडून उड्डाणाची खात्री करून घ्यावी, असा सल्लाही देण्यात आला आहे.
बर्लिन विमानतळानं आपल्या वेबसाईटवर बॅनर टाकून माहिती दिली की, युरोपभर वापरल्या जाणाऱ्या सिस्टममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने चेक-इनसाठी जास्त वेळ लागत आहे. आम्ही जलद तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहोत. यामध्ये मात्र सर्व युरोपीय विमानतळांना परिणाम झाला नाही. जर्मनीतील सर्वात मोठं फ्रँकफर्ट विमानतळ पूर्णपणे सुरळीत चालू असल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. तसेच झुरिच विमानतळ प्रशासनानंही कोणताही परिणाम झालेला नसल्याचं सांगितलं.
या घटनेमुळे शनिवारी हजारो प्रवाशांचे प्रवास आराखडे विस्कळीत झाले असून, नेमक्या किती उड्डाणांवर परिणाम झाला याबाबत अधिकृत आकडेवारी अद्याप जाहीर झालेली नाही.