नवी दिल्ली : देशाच्या विविध भागात वातावरणात सातत्यानं बदलत आहे. कुठे थंडीचा कडाका तर कुठे ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय. उत्तर भारतात थंडीचा जोर अधिक असल्याचं दिसून येतंय. देशाची राजधानी दिल्लीत थंडीचा कडाका वाढलाय. दिल्लीमध्ये तापमानाचा पारा 3 अंशावर गेला आहे. एकीकडं थंडी तर दुसरीकडं धुक्याची चादर पसरलीय. दिल्लीत ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आलाय. थंडीमुळं तेथील जनजीवन विस्कळीत झालं आहे. पालम आणि सफदरजंग भागात दाट धुक्यामुळं वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
देशाची राजधानी दिल्ली आज चांगलीच गारठली आहे. आज (दि.8) दिल्लीत थंडीची लाट आणि धुक्याची चादर पसरलीय. हवामान विभागानं आज दिल्लीत थंडीच्या लाटेचा ‘ऑरेंज अलर्ट’ आणि धुक्याचा ‘यलो अलर्ट’ जारी केलाय. किमान तापमान 3 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलेय. तर कमाल तापमान 18 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय. धुक्यामुळं पालम आणि सफदरजंगसह विविध भागात दृश्यमानता 50 मीटरपेक्षा कमी राहिली आहे.
सध्या देशातील अनेक भागात डोंगरापासून मैदानी प्रदेशापर्यंत कडाक्याची थंडी जाणवत आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा जोर वाढलाय. अनेक भागात दाट धुकं पडलंय. मध्य प्रदेशमधील अनेक भागांमध्ये किमान तापमान 2 ते 6 अंश सेल्सिअस दरम्यान आहे. पंजाबच्या अनेक भागात दाट धुकं कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. उत्तराखंड, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या विविध भागात धुकं पडण्याची शक्यता आहे.
वाढत्या थंडीचा परिणाम मानवी जीवनावर देखील होत असल्याचं दिसतंय. दिल्लीत कडाक्याच्या थंडीमुळं रस्त्यावरील गर्दीही कमी दिसतेय. थंडीमुळं जनजीवन पूर्ण विस्कळीत झालंय. दिल्ली एनसीआरमध्ये ठिकठिकाणी शेकोट्या पेटलेल्या पाहायला मिळताहेत. दाट धुक्यामुळं गाड्या उशिरानं धावताना दिसताहेत, तर काही विमानांच्या वेळांवरही परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय.
उत्तर भारतात गारठा वाढत असल्याचं चित्र दिसत आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून राजधानी दिल्लीत थंडीचा कडाका वाढत आहे. हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील चार दिवसात किमान तापमानात 4 अंश सेल्सिअसनं वाढ होणार आहे. त्यामुळं नागरिकांना थंडीच्या लाटेपासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.