Deputy Army Chief Zhang Yuxia arrested in China : चिनी लष्करातील (पीपल्स लिबरेशन आर्मी) सर्वोच्च जनरल झांग युक्सीया यांच्यासह दोन वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाच्या शिस्त आणि कायद्याचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाकडून शनिवारी देण्यात आली आहे.
चीनच्या लष्कराचे सर्वोच्च नेतृत्व राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्याकडे आहे. जनरल झांग युक्सीया हे लष्कराच्या अत्यंत प्रभावशाली सेंट्रल मिलिटरी कमिशनचे प्रथम श्रेणीचे उपाध्यक्ष असून, त्या पदानुसार ते चिनी लष्करातील सर्वोच्च अधिकारी मानले जातात. याशिवाय ते सीपीसीच्या सत्ताकेंद्रात गणल्या जाणाऱ्या 24 सदस्यीय पॉलिट ब्यूरोचेही सदस्य आहेत.
केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कार २०२६ जाहीर, रघुवीर खेडकर यांच्यासह वाचा 45 जणांची यादी
जनरल झांग युक्सीया यांच्यासोबतच जनरल लू शेन्ली यांना देखील अटक करण्यात आली आहे. जनरल शेन्ली हे सीएमसीचे सदस्य असून, चिनी लष्कराच्या संयुक्त संरक्षण दलाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते. सीपीसी सेंट्रल कमिटीमध्ये झालेल्या उच्चस्तरीय चर्चेनंतर झांग युक्सिया आणि लू शेन्ली यांच्या अटकेचा निर्णय घेण्यात आल्याचे संरक्षण मंत्रालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. या कारवाईमुळे चिनी लष्कराच्या वरिष्ठ वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी 2012 मध्ये सत्तेवर आल्यानंतर सुरू केलेल्या भ्रष्टाचाराविरोधी मोहिमेअंतर्गत याआधीही पीएलएमधील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. काहींना पदावरून हटवण्यात आले, तर काहींना कठोर शिक्षा ठोठावण्यात आल्या आहेत. झांग युक्सिया आणि लू शेन्लीयांची अटक ही त्या मोहिमेतील आतापर्यंतची सर्वात मोठ्या आणि धक्कादायक कारवायांपैकी एक मानली जात आहे.
