New Map Reveals Earth Shocking Secrets : कल्पना करा, तुम्ही तुमच्या घराच्या बाल्कनीत उभे आहात आणि अचानक काळ मागे सरकू लागला… 10 वर्ष, 100 वर्ष, हजार वर्ष… करत करत थेट 32 कोटी वर्षांपूर्वी! तुमच्या आजूबाजूच्या इमारती गायब झाल्या आहेत, रस्ते संपलेत आणि समोर दिसतोय फक्त एक अथांग समुद्र किंवा एखादा महाकाय डोंगर. हे ऐकायला एखादा सायन्स-फिक्शन सिनेमा वाटत असला, तरी शास्त्रज्ञांनी आता हे प्रत्यक्षात आणलं आहे. नेदरलँडच्या युट्रेक्ट युनिव्हर्सिटीने तयार केलेलं ‘पॅलिओजिओग्राफी मॉडेल’ (Paleogeography Model) आता सर्वसामान्यांसाठी खुलं झालं असून, याद्वारे तुम्ही तुमच्या घराचा 320 दशलक्ष वर्षांचा भूगोल शोधू शकणार आहात.
जेव्हा पृथ्वीवर फक्त एकच खंड होता
आज आपण पृथ्वीला सात खंडांमध्ये पाहतो, पण ३२ कोटी वर्षांपूर्वी चित्र पूर्णपणे वेगळं होतं. ‘पॅन्जिया’ नावाचा एकच विशाल महाखंड त्यावेळी अस्तित्वात होता. टेक्टोनिक प्लेट्सच्या हालचालींमुळे हा खंड कसा तुटला आणि भारत, आफ्रिका किंवा अमेरिका आजच्या जागी कसे पोहोचले, याचा जिवंत अनुभव हे ऑनलाइन टूल देतं. उदाहरण घ्यायचे झाले तर, 24 कोटी वर्षांपूर्वी नेदरलँडचं हवामान आजच्या दुबईसारखं (पर्शियन गल्फ) अत्यंत उष्ण होतं. मग विचार करा, तुमचं शहर त्यावेळी कोणत्या हवामानात असेल?
कसं तयार झालं हे ‘डिजिटल’ जग?
प्रोफेसर डोवे व्हॅन हिन्सबर्गन (Douwe van Hinsbergen) यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन करण्यात आलं आहे. शास्त्रज्ञांनी हे मॉडेल बनवण्यासाठी मॅग्नेटिक सिग्नल्सचा वापर केला आहे. प्राचीन खडकांमध्ये दडलेल्या चुंबकीय लहरींचा अभ्यास करून त्या काळी हे खडक पृथ्वीच्या कोणत्या ध्रुवाजवळ होते, याचा नकाशा तयार केला. या मॉडेलच्या मदतीने कोट्यवधी वर्षांपूर्वीचे डोंगर, नद्या आणि खंडांची अचूक जागा निश्चित करण्यात आली आहे.
केवळ कुतूहल नाही, तर विज्ञानासाठीही महत्त्वाची झेप
हे टूल केवळ घराची लोकेशन पाहण्यापुरतं मर्यादित नसून. संशोधक एमिलिया जारोचोव्स्का यांच्या मते, यामुळे पृथ्वीवर झालेल्या मोठ्या विनाशांच्या काळात जीवसृष्टी कशी वाचली आणि हवामान बदलाचा प्राण्यांवर काय परिणाम झाला, हे समजण्यास मोठी मदत होणार आहे. त्याशिवाय जीवाश्मांचा (Fossils) शोध घेण्यासाठी हे टूल वरदान ठरणार आहे.
तुम्ही कसं पाहू शकता?
हे ऑनलाइन टूल सर्वांसाठी खुलं असून, तुम्ही कोणत्याही ठिकाणाचं नाव टाकून त्याचा 320 दशलक्ष वर्षांपूर्वीचा प्रवास पाहू शकता. एखाद्या सहलीला जाण्यापूर्वी किंवा आपल्या गावाबद्दल माहिती घेताना, ‘कोटी वर्षांपूर्वी इथे काय होतं’ हे पाहणं खरोखरच अंगावर काटा आणणारं असेल.
विज्ञानाच्या या किमयेमुळे आपल्याला हे लक्षात येतं की, ज्या जमिनीवर आज आपण ‘माझं घर’ म्हणून हक्क सांगतो, ती जमीन प्रत्यक्षात कोट्यवधी वर्षांपासून जगभर प्रवास करत आहे. कधी ती दक्षिण ध्रुवाच्या बर्फात होती, तर कधी विषुववृत्ताच्या रणरणत्या उन्हात.
हे टूल केवळ एक नकाशा नाही, तर ते आपल्याला जाणीव करून देतं की, ही पृथ्वी सतत बदलत आहे. निसर्गाचा हा ‘फ्लॅशबॅक’ पाहताना आपण केवळ एका शहराचा इतिहास पाहत नाही, तर मानवी अस्तित्वाच्या कित्येक कोटी वर्षे आधीपासून सुरू असलेल्या एका अद्भूत प्रवासाचे साक्षीदार होतो. त्यामुळे, पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही तुमच्या बाल्कनीत उभे राहाल, तेव्हा फक्त समोरची इमारत पाहू नका; तर विचार करा, तुमच्या पायाखालची हीच जमीन कधीकाळी जगाच्या दुसऱ्या टोकाला एखाद्या महाकाय खंडाचा भाग होती. विज्ञानाच्या या ‘टाईम मशीन’मधून डोकावून पाहिलं, तर पृथ्वीचा इतिहास कोणत्याही थ्रिलर कथेपेक्षा कमी वाटत नाही. चला तर मग, तुम्ही तयार आहात का तुमच्या घराचा 320 दशलक्ष वर्षांपूर्वीचा ‘पत्ता’ शोधायला?
