…म्हणून जगात 90% लोक ‘राइट-हँडेड’; ऑक्सफर्डच्या शास्त्रज्ञांनी उलगडलं रहस्य
Right Handed राइट-हँडेड असणे हे मानवाच्या दोन प्रमुख वैशिष्ट्यांशी जोडलेले आहे एक आपले ताठ चालणे आणि आपल्या मोठ्या मेंदूचा विकास
Why Mostly Human’s Are Right Handed : तुम्ही कधी विचार केला आहे का, की या जगात दर 10 पैकी 9 लोक लिहिण्यासाठी, जेवण्यासाठी किंवा कोणतंही महत्त्वाचं काम करण्यासाठी उजव्याच हाताचा वापर का करतात? जगातील 90% लोकसंख्या ‘राइट-हँडेड’ असणं हे मानवी इतिहासातील सर्वात मोठ्या रहस्यांपैकी एक मानलं जात होतं. यासाठी अनेक अंदाज लावले गेले परंतु, आता ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या एका संशोधनाने या रहस्यावरून अखेर पडदा उठवला आहे. शास्त्रज्ञांच्या मते, याचं उत्तर आपल्या हातात नाही, तर आपल्या पायांमध्ये आणि मेंदूमध्ये दडलेलं आहे. नेमकं ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचं संशोधन काय? याबद्दल जाणून घेऊया..
माकडे आणि मानवामध्ये नेमका फरक काय?
‘PLOS Biology’ या नामांकित जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, ऑक्सफर्ड आणि रीडिंग युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी 41 वेगवेगळ्या प्रजातींच्या तब्बल 2,025 माकडे आणि चिम्पांझींच्या सवयींचा अभ्यास केला. या संशोधनात असं दिसून आलं की, काही विशिष्ट माकडे त्यांचा एखादा आवडता हात वापरतात. पण, मानवाइतका उजव्या हाताचा अतिवापर जगात इतर कोणताही प्राणी करत नाही. शास्त्रज्ञांच्या ‘मीन हँडेडनेस इंडेक्स’वर बाकी सर्व प्राणी ‘शून्य’च्या आसपास आहेत, म्हणजेच ते दोन्ही हात सारखेच वापरतात. मात्र, या इंडेक्सवर मानवाचा स्कोअर तब्बल 0.76 आहे, जो जगभरात सर्वाधिक आणि आश्चर्यकारक आहे.
रहस्य उलगडणारे ‘ते’ दोन महत्त्वाचे घटक
सुरुवातीला शास्त्रज्ञांनी राहणीमान, शरीराचे वजन आणि सामाजिक रचना या थिअरीज तपासून पाहिल्या, पण मानवाचे रहस्य सुटू शकले नाही. खरा ट्विस्ट तेव्हा आला जेव्हा शास्त्रज्ञांनी संशोधनात मेंदूचा आकार आणि इंटरमेम्बरल इंडेक्स म्हणजेच आपले हात आणि पाय यांच्या लांबीचे गुणोत्तर या दोन नवीन गोष्टी जोडल्या. या दोन घटकांचा अभ्यास करताच उजव्या हाताच्या वापराचे रहस्य पूर्णपणे उलगडले. मानवाचे पाय त्याच्या हातांपेक्षा जास्त लांब आहेत, जे आपण दोन पायांवर ताठ उभे राहून चालत असल्याचे दर्शवते.
दोन पायांवर चालण्याचा आणि ‘उजव्या’ हाताचा काय संबंध?
“आपले राइट-हँडेड असणे हे मानवाच्या दोन प्रमुख वैशिष्ट्यांशी जोडलेले आहे एक आपले ताठ चालणे आणि आपल्या मोठ्या मेंदूचा विकास.” असे या अभ्यासाचे प्रमुख संशोधक डॉ. थॉमस ए. पुशेल यांचे मत आहे. लाखो वर्षांपूर्वी जेव्हा आपले पूर्वज झाडावरून उतरून जमिनीवर दोन पायांवर चालू लागले, तेव्हा त्यांचे दोन्ही हात पूर्णपणे मोकळे झाले. ताठ चालण्यामुळे शरीराचा समतोल बदलला आणि पायांच्या या ताकदीने आपल्या एका हाताला म्हणजे उजव्या हाताला डाव्या हातापेक्षा जास्त कार्यक्षम आणि ‘स्पेशलाइज्ड’ बनण्याची संधी दिली. उजव्या हाताचे नियंत्रण करणाऱ्या मेंदूच्या भागाचा विकासही वेगाने झाला.
18 लाख वर्षांपूर्वीचा भक्कम पुरावा
मानवाचे उजव्या हातावरील प्रेम नवीन नाही, तर याचे पुरातत्वीय पुरावेही सापडले आहेत. टांझानिया येथे सापडलेल्या 18 लाख वर्षांपूर्वीच्या ‘होमो हॅबिलिस’ या मानवी पूर्वजाच्या जबड्याच्या हाडावरून असे दिसून आले की, त्यांच्या पुढच्या दातांवर उजव्या बाजूला झुकलेल्या रेषा होत्या. म्हणजेच, 18 लाख वर्षांपूर्वीचा आदिमानवही अन्न खाताना किंवा इतर कामे करताना उजव्या हाताचाच वापर करत होता. तसेच गेल्या 5 लाख वर्षांपासून मानव शस्त्रे बनवण्यासाठी उजव्या हातालाच प्राधान्य देत आला आहे. थोडक्यात काय तर, आज आपण ज्या उजव्या हाताने पेन पकडतो किंवा मोबाईल स्क्रोल करतो, त्याचा थेट संबंध लाखो वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांनी दोन पायांवर उभे राहून घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाशी आहे.