US Deportation Indians : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या (Donald Trump) आदेशानंतर अवैध प्रवाशांविरोधात मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत सोमवारी अमेरिकेचे एक सैन्य विमान अवैध प्रवाशांना घेऊन भारताकडे रवाना झाले. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की विमान कमीत कमी 24 तासांच्या आत भारतात पोहोचेल. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्रपती झाल्यानंतर भारतात हे पहिलेच निर्वासन आहे. याआधी ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा केली होती. भारताने अवैध प्रवाशांना (अनधिकृत स्थलांतरीत) परत घेण्याबाबत आधीच सहमती दर्शवली होती. जवळपास 18 हजार प्रवाशांना परत भारतात आणणार असल्याचे सांगण्यात आले होते. या लोकांनी बेकायदेशीर मार्गाने अमेरिकेत प्रवेश केला होता.
डोनाल्ड ट्रम्प यांना झटका! वादग्रस्त नागरिकता आदेशावर न्यायालयाकडून स्थगिती
बेकायदेशीर मार्ग आणि अपूर्ण कागदपत्रे असतानाही अमेरिकेत प्रवेश घेतलेल्या विविध देशांच्या नागरिकांवर अमेरिकी प्रशासनाची नजर आहे. अशा अवैध प्रवासी लोकांना देशाबाहेर करण्याचे आश्वासन डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक प्रचारात दिले होते. सत्तेत आल्यानंतर त्यांनी या दिशेने कार्यवाही सुरू केली आहे. याचा पहिला झटका भारताला बसला आहे.
अमेरिकेत या मोहिमेला सुरुवात झाली आहे. यासाठी सरकारने सैन्याची मदत घेतली आहे. यासाठी अमेरिका-मेक्सिको सीमेवर अतिरिक्त सैनिकांची तैनाती करण्यात आली आहे. अवैध प्रवाशांना रोखण्यासाठी सैन्य ठिकाणांचा वापर करण्यात येत आहे. या प्रवाशांना पुन्हा त्यांच्या देशात पाठविण्यासाठी सैन्य विमानांचा वापर केला जात आहे. या अंतर्गत अवैध प्रवाशांना ग्वाटेमाला, पेरू, होंडुरास या देशात निर्वासित केले आहे. रिपोर्टनुसार भारत सर्वाधिक दूरचे ठिकाण आहे. येथेही विमानाने अवैध प्रवासी पाठवण्यात येत आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याबरोबर मागील महिन्यात फोनवरुन चर्चा केली होती. त्यावेळी दोघांत अवैध प्रवाशांच्या मुद्द्यावरही चर्चा झाली होती. अवैध प्रवाशांच्या वापसीसाठी भारत योग्य निर्णय घेईल असे ट्रम्प म्हणाले होते. व्हाइट हाउसनुसार दोन्ही नेत्यांत सकारात्मक चर्चा झाली तसेच दोन्ही देशांत सहकार्याच्या मुद्द्यावर चर्चा झाली.
डॉलर सोडला तर 100 टक्के टॅरिफ, ट्रम्प यांचा ब्रिक्सला इशारा; भारताची डोकेदुखी वाढणार?
प्यू रिसर्च सेंटरच्या अहवालानुसार अमेरिकेत आजममितीस 7.25 लाख बेकायदेशीर भारतीय स्थलांतरीत राहतात. या बाबतीत मेक्सिको, एल साल्वाडोरनंतर भारत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. कारण भारतातून दरवर्षी हजारो भारतीय नागरिक अमेरिकेत स्थायिक होण्यासाठी जात असतात.