अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प (Donald Trump) पुन्हा एकदा फेसबुक (Facebook) आणि इंस्टाग्रामवर आपल्या प्रतिक्रिया देताना दिसणार आहेत. येत्या आठवड्यात डॉनल्ड ट्रम्प यांचे फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाउंट पुन्हा सुरु करण्यात येणार आहे, अशी घोषणा मेटाने केली आहे.
कॅपिटल हिल (Capitol Hill) दंगलीनंतर ६ जानेवारी रोजी मेटाने अमेरिकेचे माजी अध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांचे अकाउंट बंद करण्यात आले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोशल मीडिया कंपनीने एका ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे की, वादग्रस्त पोस्ट टाळण्यासाठी नवीन नियम बनवले. फेसबुक आणि इन्स्टाग्राम हे राजकीय पोस्ट करण्याचे प्रमुख साधन असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले होते.
यापूर्वी असे वृत्त आले होते की, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर परत येऊ इच्छित आहेत. डॉनल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, आम्ही मेटाशी चर्चा करत आहोत. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, त्यांना आमची गरज आहे, त्यापेक्षा जास्त गरज आम्हाला आहे. विशेष म्हणजे मेटा या महिन्यात डॉनल्ड ट्रम्प यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून माघार घेण्याबाबत निर्णय घेणार आहेत.
६ जानेवारी २०२१ रोजी अमेरिकन संसदेवर झालेल्या हल्ल्यानंतर डॉनल्ड ट्रम्प यांच्यावर फेसबुकने बंदी घातली होती. खरं तर, डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या पोस्टमध्ये दावा केला आहे की २०२० च्या अध्यक्षीय निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदानात हेराफेरी झाली होती. त्यानंतरच फेसबुकने डॉनल्ड ट्रम्प यांच्या अकाऊंटवर हिंसा भडकावल्याच्या आरोपावरून बंदी घातली होती. ट्विटरनेही डॉनल्ड ट्रम्प यांच्या अकाउंटवर बंदी घातली आहे. मात्र, इलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यानंतर डॉनल्ड ट्रम्प यांचे अकाउंट पुन्हा सुरू करण्यात आले. डॉनल्ड ट्रम्प यांनी अद्याप ट्विट केलेले नाही आणि ट्विटरऐवजी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सोशलवर पोस्ट करत आहेत.