Pakistan News : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला कायमचा धडा शिकवण्याचा निर्णय घेतला आहे. सुरुवातीलाच पाच मोठे निर्णय घेऊन धक्का दिला. आता सैन्यानेही मोर्चा सांभाळला आहे. भारतातील या घडामोडींनी पाकिस्तानी राज्यकर्त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली आहे. भारत आपल्यावर कधीही हल्ला करू शकतो अशी भीती त्यांना सतावू लागली आहे. पाकव्याप्त काश्मीरात (POK) आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यांच्या बदल्याही रोखण्यात आल्या आहेत.
झेलम व्हॅलीतील आरोग्य विभागाच्या 25 एप्रिल रोजीच्या आदेशात आपत्कालीन स्थितीचा हवाला देण्यात आला होता. सर्व रुग्णालयांतील आरोग्य युनिट्समधील कर्मचाऱ्यांना त्यांच्या ड्युटीच्या ठिकाणी तैनात राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. कोणत्याही कर्मचाऱ्याला सुट्टी किंवा बदलीची परवानगी मिळणार नाही. सरकारी वाहनांचा वापर खासगी कामांसाठी करता येणार नाही. POK प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयातून त्यांची घबराट स्पष्ट दिसून येत आहे. भारतीय सुरक्षा यंत्रणांनीही या आदेशाला गांभीर्याने घेतलं आहे. नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानकडून कुरापती काढल्या जाऊ शकतात असा अंदाज सुरक्षा यंत्रणांनी व्यक्त केला आहे.
बलूचिस्तान, खैबर पख्तूनख्वा अन् LOC.. तिन्ही बाजूंनी घेरलाय पाकिस्तान
कोणत्याही अनुचित घटनेला रोखण्यासाठी जिल्हा रुग्णालयासह जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्रात डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ आणि रुग्णवाहिका चालकांनी तयार राहावे. जे सुट्टीवर आहेत त्यांनी तत्काळ कामावर हजर व्हावं. आपले ड्यूटी स्टेशन सोडण्याआधी कार्यालयाकडून परवानगी घ्या. हा आदेश तत्काळ प्रभावाने लागू होत आहे असे या आदेशात म्हटले आहे.
घुसखोरीची शक्यता, निगराणी वाढली
गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या अपडेटनुसार पहलगाम आणि आसपासच्या भागात अतिरेकी घुसखोरी करण्याची शक्यता आहे. आतंकवादी घडामोडीही वाढण्याची शक्यता आहे. यामुळे भारतीय सुरक्षा दलांनी पहलगाम आणि अनंतनाग जिल्ह्यांत निगराणी वाढवली आहे. नियंत्रण रेषेवरही कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. संवेदनशील भागात अधिक लक्ष देण्यात येत आहे.
भारताने पाकिस्तानबरोबरचा सगळाच व्यापार रोखला आहे. त्यामुळे औषधांचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठी पाकिस्तानात औषधांचा साठा केला जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार आरोग्य अधिकाऱ्यांनी युद्धपातळीवर काम सुरू केले आहे. व्यापार बंद झाल्याने पाकिस्तानच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे येथे आता औषधांचा साठा करण्यावर भर दिला जात आहे.
पाकिस्तानात पाणीबाणी! अनेक भागाात पूर, इमर्जन्सी घोषित; पाकिस्तानचे भारतावरच आरोप