ब्रेकिंग! अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमावाद पुन्हा पेटला, दोन्ही देशांतील चकमकींमध्ये शेकडो सैनिक ठार

अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या दोन शेजारी देशांमध्ये गेल्या काही दिवसांपासून तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

_Afghanistan Pakistan Military Conflict

Afghanistan Pakistan Military Conflict : अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या दोन शेजारी देशांमध्ये गेल्या काही दिवसांपासून तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. सीमावर्ती भागात सुरू असलेल्या लष्करी संघर्षाने परिस्थिती अधिकच चिघळली असून, दोन्ही देशांनी एकमेकांवर मोठे आरोप केले आहेत. अफगाणिस्तानकडून पाकिस्तानचे 58 सैनिक ठार केल्याचा दावा करण्यात आला असताना, पाकिस्तानने प्रत्युत्तरादाखल हल्ले करत 200 हून अधिक तालिबानी सैनिकांचा खात्मा केल्याचा दावा केला आहे.

पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू

पाकिस्तानी लष्कराने (Afghanistan Pakistan Military Conflict) त्यांच्या निवेदनात म्हटले आहे की, सीमेजवळ झालेल्या चकमकींमध्ये 23 पाकिस्तानी (Pakistan) सैनिकांचा मृत्यू झाला असून, 29 सैनिक जखमी झाले आहेत. अफगाणिस्तानातील तालिबानी छावण्या, चौक्या आणि दहशतवादी प्रशिक्षण केंद्रांवर अचूक हल्ले तसेच प्रत्यक्ष छापे टाकण्यात आले. या कारवाईत 200 हून अधिक तालिबानी (Taliban Soldiers) आणि दहशतवादी ठार झाले आहेत.

अफगाणिस्तानच्या भूमीवर अतिक्रमण

दरम्यान, अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने पाकिस्तानवर आरोप केला आहे की, त्यांनी त्यांच्या भूमीवर वारंवार हवाई हल्ले करून सार्वभौमत्वाचे उल्लंघन केले आहे. मंत्रालयाने म्हटले की, “शनिवारी रात्री उशिरा आमच्या सैन्याने पाकिस्तानच्या सातत्याने होत असलेल्या आक्रमणाला प्रत्युत्तर दिले आणि सीमेवर यशस्वी कारवाई केली. भविष्यात अफगाणिस्तानच्या भूमीवर अतिक्रमण केल्यास कठोर प्रत्युत्तर दिले जाईल. तालिबान सरकारचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद यांनी रविवारी सांगितले की, या संघर्षात पाकिस्तानचे 58 सैनिक मारले गेले आणि 30 सैनिक जखमी झाले आहेत. त्यांनी म्हटले की, पाकिस्तानने आमच्या भूमीवर केलेल्या हवाई हल्ल्याचा हा बदला होता. तसेच तालिबानचे 9 सैनिक या संघर्षात मृत्युमुखी पडल्याचेही त्यांनी कबूल केले.

पाकिस्तानविरुद्धच्या दहशतवादी कारवाया

अफगाणिस्तानच्या सरकारी वृत्तसंस्था आरटीए च्या माहितीनुसार, दक्षिण हेलमंड प्रांतातील सीमावर्ती भागात अफगाण सैन्याने पाकिस्तानच्या तीन लष्करी चौक्या ताब्यात घेतल्या असून, या कारवाईदरम्यान 15 पाकिस्तानी सैनिक ठार झाले आहेत. दरम्यान, पाकिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने आपल्या सुरक्षा यंत्रणांवर हल्ला झाल्याची पुष्टी केली. त्यांनी तालिबान सरकारवर आरोप केला आहे की, त्यांनी आपल्या भूमीचा वापर पाकिस्तानविरुद्धच्या दहशतवादी कारवायांसाठी होऊ दिला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी कठोर भूमिका घेत सांगितले की, पाकिस्तान आपल्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड करणार नाही. जर तालिबानने दहशतवाद्यांना आश्रय दिला तर आम्हाला आवश्यक ती पावले उचलावी लागतील.

संघर्ष कधीपासून सुरू झाला?

हा संघर्ष काही दिवसांपूर्वी म्हणजेच 9 ऑक्टोबर रोजी सुरू झाला, जेव्हा अफगाणिस्तानच्या राजधानी काबूलमध्ये तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) च्या ठिकाणांवर हवाई हल्ले झाले. तालिबानने हे हल्ले पाकिस्तानने केल्याचा आरोप केला होता. पाकिस्तानने या हल्ल्यांची जबाबदारी मान्य केली नसली तरी त्यांनी तालिबान सरकारला स्पष्ट इशारा दिला होता की, त्यांच्या भूमीवर TTP ला आश्रय देऊ नये. मात्र, त्यानंतर पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील ओरकझाई जिल्ह्यात टीटीपीने केलेल्या हल्ल्यात 11 पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याने दोन्ही देशांतील तणाव अधिक वाढला.

follow us