फ्रान्समध्ये महागाई आणि शिक्षण व्यवस्थेविरोधातील आंदोलनाला हिंसक वळण; एक हजारांहून अधिक जणांना अटक

France protests: पॅरिससह देशातील अनेक शहरांमध्ये आंदोलक आणि पोलिसांमध्ये संघर्ष उडाला.

France

France

France protests : वाढता राहणीमानाचा खर्च आणि शिक्षण व्यवस्थेविरोधात फ्रान्समध्ये सुरू असलेल्या आंदोलनाला शनिवारी रात्री हिंसक वळण लागले आहे. पॅरिससह देशातील अनेक शहरांमध्ये आंदोलक आणि पोलिसांमध्ये संघर्ष उडाला. या आंदोलनादरम्यान जवळपास एक हजारांहून अधिक आंदोलकांना अटक करण्यात आली आहे.

या अटकेबाबत फ्रान्सचे गृहमंत्री लॉराँ न्युनेझ यांनी माहिती दिली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी देशभरात 70 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पॅरिसमधील मुख्य मोर्चाच्या अखेरीस हुड आणि चेहऱ्यावर मास्क घातलेल्या सुमारे 500 तरुणांनी गोंधळ घातला. त्यांना पांगवण्यासाठी दंगल नियंत्रण पथकाने अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि पाण्याच्या तोफांचा वापर केला. आठवडाभरापूर्वी फ्रान्समध्ये अनेक ठिकाणी दंगली आणि लुटमारीच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर पुन्हा एकदा परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे.


रत्नागिरीत चार दिवसांत तीन तरुणींचा मृत्यू; खेड, चिपळूण आणि गुहागरमधील घटनांनी चिंता वाढवली

फ्रान्सच्या गृह मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशभरातील आंदोलनांमध्ये सुमारे 4 लाख 10 हजार लोक सहभागी झाले होते. मात्र, CGT कामगार संघटनेने हा आकडा जवळपास आठ लाख असल्याचा दावा केला आहे. असोसिएटेड प्रेस (AP) या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे. गृह मंत्रालयाने देशभरात एकूण 289 आंदोलनांची नोंद केली.


पॅरिसमधील मोर्चानंतर अश्रुधूर आणि पाण्याच्या तोफांचा वापर

पॅरिस पोलिसांच्या माहितीनुसार, राजधानीतील मुख्य मोर्चामध्ये किमान 1 लाख 10 हजार लोक सहभागी झाले होते. दुसरीकडे, CGT संघटनेने हा आकडा 2 लाख 50 हजार असल्याचे सांगितले. प्रशासनाने अखेरच्या क्षणी आदेश जारी करून मोर्चाला पॅरिसच्या आग्नेय भागातील निर्धारित मार्गावरच मर्यादित ठेवले होते. सुरुवातीला मोर्चा शांततेत पार पडला. मात्र, गर्दी पांगू लागल्यानंतर संघर्षाला सुरुवात झाली. काही आंदोलकांनी पोलिसांच्या दिशेने वस्तू आणि फटाके फेकले. त्याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या, आवाज करणारी स्फोटके आणि पाण्याच्या तोफांचा वापर केला.


तिसरी मुंबई महाराष्ट्राचं ग्रोथ इंजिन बनणार; नैना प्रकल्पावर फडणवीसांचं मोठं विधान, शेतकऱ्यांना दिला शब्द

गोंधळ घालणाऱ्या सुमारे 500 जणांना जबाबदार धरत गृहमंत्री न्युनेझ यांनी त्यांना ‘दंगलखोर’ संबोधले. पॅरिस पोलिसांनी 3 हजारांहून अधिक तपासण्या केल्या, तर 65 जणांना अटक करण्यात आली.पोलिसांच्या लाठीहल्ल्यात चेहऱ्याला दुखापत झालेल्या डेव्हिड नावाच्या एका आंदोलकाने एएफपी या वृत्तसंस्थेशी बोलताना पोलिसांवर आंदोलकांना मारहाण केल्याचा आरोप केला.

मार्सेल ते लीलपर्यंत अनेक शहरांमध्ये हिंसाचार
फ्रान्समधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असलेल्या मार्सेलमध्ये काही तरुणांनी कचराकुंड्यांना आग लावली. तसेच सुरक्षा दलांच्या दिशेने दगड आणि बाटल्या फेकल्या. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, शहरातील दोन दागिन्यांच्या दुकानांसह अनेक दुकानांची लूट करण्यात आली.
मार्सेलमधील मोर्चात 1 लाख लोक सहभागी झाल्याचा दावा CGT संघटनेने केला, तर स्थानिक प्रशासनाने हा आकडा 17 हजार असल्याचे सांगितले.

ल्योन, बोर्डो, ग्रेनोबल, क्लेरमाँ-फेराँ, लील, रेनेस, नँट आणि टुलूझ या शहरांमध्येही संघर्षाच्या घटना घडल्या. ल्योनमध्ये 36 जणांना अटक करण्यात आली आहे. तर 22 जण जखमी झाल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली. जखमींमध्ये सुरक्षा दलांचे 18 कर्मचारी असल्याचे सांगण्यात आले.ग्रेनोबलमध्ये काळ्या रंगाचे कपडे परिधान केलेल्या सुमारे 400 मुखवटाधारी लोकांनी पोलिसांवर मोर्टारसदृश स्फोटक साधने आणि इतर वस्तू फेकून हल्ला केल्याचे इसेर प्रांताच्या प्रशासनाने सांगितले. नँट, मार्सेल आणि ग्रेनोबल येथे लुटमारीच्या घटनाही नोंदवण्यात आल्या.
लील आणि उत्तर फ्रान्समधील काही शहरांमध्ये एकट्याने फिरणाऱ्या अल्पवयीन मुलांवरील रात्रीच्या संचारबंदीचा कालावधी सोमवार सकाळपर्यंत वाढवण्यात आला.

उजव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यांकडून नवा संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न?
गृहमंत्री न्युनेझ यांच्या म्हणण्यानुसार, दक्षिण फ्रान्समधील काही शहरांमध्ये अतिउजव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यांनी डाव्या विचारसरणीच्या गटांशी संघर्ष घडवून आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आंदोलनादरम्यान संघर्षाची नवी आघाडी उघडली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.नाइस शहरात आंदोलकांवर झालेल्या हल्ल्यात तीन जण जखमी झाले. या प्रकरणी अतिउजव्या विचारसरणीशी संबंधित असल्याचे वर्णन केलेल्या 11 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती आल्प्स-मॅरिटाइम्स प्रांताच्या प्रशासनाने दिली.

Exit mobile version