फ्रान्समध्ये इन्फोसिसला मोठा दणका; कर्मचाऱ्यांच्या कामाच्या तासांच्या नोंदीतील त्रुटींमुळे 2 कोटींचा दंड

फ्रान्समधील प्रादेशिक कामगार प्राधिकरणाने इन्फोसिसवर 1 लाख 75 हजार युरो म्हणजेच भारतीय रुपयांत सुमारे 2 कोटी रुपये दंड आकाराला आहे.

  • Written By: Published:
Untitled Design   2026 07 29T171112.878

Major setback for Infosys in France : देशातील आघाडीची कंपनी असलेल्या इन्फोसिसचे संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांनी काही वर्षांपूर्वी तरुणांनी आठवड्यातून 70 तास काम करून देशभरात चर्चा घडवून आणली होती. आता त्याच इन्फोसिस कंपनीला फ्रान्समध्ये कर्मचाऱ्यांच्या कामाच्या तासांच्या नोंदीसंदर्भात नियमांचे पालन न केल्याप्रकरणी दंड ठोठावण्यात आला आहे.  फ्रान्समधील प्रादेशिक कामगार प्राधिकरणाने इन्फोसिसवर 1 लाख 75 हजार युरो म्हणजेच भारतीय रुपयांत सुमारे 2 कोटी रुपये दंड आकाराला आहे.

कंपनीच्या नियामक खुलाशानुसार कर्मचाऱ्यांच्या कामाच्या तासांची नोंद ठेवण्यासाठी वापरली जाणारी प्रणाली फ्रान्सच्या कामगार कायद्यांशी पूर्णपणे सुसंगत नसल्याचे तपासात आढळून आले. फ्रेंच अधिकाऱ्यांनी केलेल्या निरीक्षणात या प्रणालीमध्ये विश्वसनीयता, पडताळणीक्षमता आणि देखरेख यंत्रणा यासंबंधी काही त्रुटी असल्याचे नमूद केले आहे. विशेषतः काही कर्मचाऱ्यांच्या कामाच्या तासांची अचूक नोंद आणि त्यावरील नियंत्रणाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले.

इन्फोसिसने 24 जुलै रोजी दंडासंदर्भातील नोटीस प्राप्त झाल्याचे सांगितले असून या प्रकरणाचा आढावा घेतला जात असल्याचे स्पष्ट केले आहे. कंपनीने हा दंड त्यांच्या आर्थिक स्थिती, व्यवसाय संचालन किंवा प्रकल्पांच्या अंमलबजावणीवर कोणताही मोठा परिणाम करणार नसल्याचे म्हटले आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा नारायण मूर्ती यांच्या 2023 मधील 70 तासांच्या कामाच्या आठवड्यावरील विधानाची चर्चा सुरू झाली आहे.

लोकसभेत राहुल गांधींचा गंभीर आरोप; शिक्षण मंत्रालय नाही, RSS चालवतंय देशाची शिक्षण व्यवस्था

त्यावेळी त्यांच्या वक्तव्याला काही उद्योगपतींचा पाठिंबा मिळाला होता, तर कामगार हक्कांसाठी काम करणाऱ्या संघटना आणि अनेक कर्मचाऱ्यांनी त्याला विरोध दर्शवला होता. काम-जीवन समतोल आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा मुद्दा त्यावेळी चर्चेच्या केंद्रस्थानी होता. मात्र, फ्रान्समधील सध्याचे प्रकरण त्या वादापेक्षा अगदी वेगळे आहे. येथे इन्फोसिसवर कर्मचाऱ्यांकडून जास्त काम करून घेतल्याचा आरोप नसून कामाच्या तासांचून नोंद ठेवणारी प्रणाली फ्रेंच कायद्यांनुसार पुरेशी अचूक आणि पडताळता येण्याजोगी नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.

फ्रान्समध्ये कामगार संरक्षणनियं अत्यंत कठोर असे मानले जातात. तेथे कंपन्यांना कर्मचाऱ्यांच्या कामाच्या तासांची अचूक, विश्वासार्ह आणि पडताळणी करता येईल अशी नोंद ठेवणे बंधनकारक असते. यामध्ये 35 तासांच्या कामाचा आठवडा, अतिरिक्त कामाचे तास आणि अनिवार्य विश्रांती कालावधी यांचे काटेकोर पालन करावे लागते. त्यामुळे इन्फोसिसवरील हा दंड हा कामाच्या तासांच्या व्यवस्थापनातील प्रशासकीय त्रुटींशी संबंधित असून कर्मचाऱ्यांकडून जास्त तास काम करून घेतल्याचे कोणतेही निष्कर्ष या प्रकरणात नोंदवले गेलेले नाहीत.

follow us