दुकाने लुटली, जाळपोळ केली! फ्रान्समध्ये महागाईला आणि कमी पगाराला कंटाळून लाखो लोकं रस्त्यावर उतरली
France Protests Against Inflation: फ्रान्स, बेल्जियम, इटली आणि पोर्तुगालमध्ये लाखो लोक महागाई आणि कमी पगाराविरोधात रस्त्यावर उतरलेत.
France Protests Against Inflation Historic Town Hall Fire: महागाई वाढत आहे, पगार कमी आहेत आणि सार्वजनिक सेवांची स्थिती खालावत आहे. या प्रश्नांवरून शनिवारी फ्रान्स, बेल्जियम, इटली आणि पोर्तुगालमध्ये लाखो लोक रस्त्यावर उतरले. काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले. आंदोलकांनी दुकानांची तोडफोड केली, काही इमारतींना आग लावली, तर पोलिसांनी गर्दी पांगवण्यासाठी अश्रुधुराचा आणि पाण्याच्या फवाऱ्यांचा मारा केला. या आंदोलनांमुळे युरोपमधील सरकारांवर दबाव वाढला आहे.
राज्य सरकारचा खर्चावर अंकुश; सर्व विभागांना 20 टक्के निधी कपातीच्या सूचना, दुष्काळासाठी निधी वळवणार?
फ्रान्समध्ये साडेपाच लाख लोक रस्त्यावर
फ्रान्समध्ये वाढती महागाई, इंधनाचे वाढते दर आणि शाळांची खराब स्थिती याविरोधात सुमारे 5 लाख 50 हजार लोकांनी आंदोलन केले. पॅरिससह मार्से, नीस, नँट्स, बोर्डो, लिले आणि इतर शहरांमध्ये आंदोलने झाली. काही ठिकाणी दुकानांची लूटमार आणि जाळपोळ करण्यात आली. पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराचा वापर केला आणि लाठीचार्ज केला.
या आंदोलनादरम्यान एका 143 वर्षे जुन्या ऐतिहासिक वास्तूचे (टाऊन हॉल) नुकसान झाल्याचेही समोर आले. आंदोलकांनी आग लावल्यामुळे या वास्तूचे छत कोसळून खालच्या मजल्यांवर पडले आहे. लिमोज शहरात टाऊन हॉलच्या बाहेरील भागाला आग लागल्याने इमारतीचे मोठे नुकसान झाले. स्थानिक अधिकाऱ्यांनी या घटनेला सांस्कृतिक वारशाचे मोठे नुकसान म्हटले आहे.
पोलिसांच्या कारवाईवरही प्रश्न
आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या कारवाईवरूनही वाद निर्माण झाला आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला पोलिसांच्या कारवाईत एका 14 वर्षीय मुलाच्या जबड्याला फ्रॅक्चर झाले होते. तसेच, अलेन्कॉन येथे एका पोलीस अधिकाऱ्याने मुलीची मान पकडल्याचे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले. या घटनांमुळे पोलिसांच्या वागणुकीवर टीका होत आहे. दरम्यान, आंदोलनांशी संबंधित प्रकरणांत किमान 195 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
गेल्या महिन्यात विद्यार्थ्यांनी सुरू केलेले हे आंदोलन आता व्यापक झाले आहे. महागाई, शाळांची स्थिती आणि सरकारच्या निष्क्रियतेविरोधात लोक आपला संताप व्यक्त करत आहेत. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी शांततापूर्ण आंदोलनात अडथळे आणणाऱ्या आणि तोडफोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
बेल्जियममध्ये अश्रुधूर आणि वॉटर कॅननचा वापर
बेल्जियममध्येही आंदोलनाला हिंसक वळण लागले. ब्रुसेल्समध्ये आंदोलकांनी पोलिसांच्या दिशेने वस्तू फेकल्याचा आणि काही ठिकाणी आग लावल्याचा आरोप आहे. पोलिसांनी गर्दी पांगवण्यासाठी अश्रुधुराचा आणि पाण्याच्या फवाऱ्यांचा वापर केला. लिएज शहरातही पोलिसांनी वॉटर कॅनन तैनात केले होते.
दिवाळीआधी FDA चा दणका! परभणीत 63 लाखांचा फरसाण जप्त, धाराशिवमध्ये 16 लाखांच्या गुटख्यावर कारवाई
पोर्तुगालमध्ये घरांच्या वाढत्या किमतींचा मुद्दा
पोर्तुगालमध्ये वाढता राहणीमानाचा खर्च, कमी वेतन आणि घरांच्या वाढत्या किमतींविरोधात हजारो लोकांनी मोर्चा काढला. 2017 पासून देशात घरांच्या किमती दुप्पट झाल्या आहेत. भाड्याने घर घेणेही महाग झाले आहे. सरकारने आंदोलकांच्या मागण्यांपुढे झुकणार नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, राजकीय नेत्यांना सामान्य नागरिकांच्या अडचणींची जाणीव नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
इटलीतही पोलिसांशी संघर्ष
इटलीतील मिलान आणि बोलोग्ना शहरांतही निदर्शने झाली. काही आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली आणि त्यांच्याशी संघर्ष झाला. तर काही ठिकाणी वाढत्या महागाईविरोधात शांततेत आंदोलन करण्यात आले.
एकूणच, वाढती महागाई, कमी वेतन, महागडी घरे आणि सार्वजनिक सेवांची खालावलेली स्थिती यामुळे युरोपमधील नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. या असंतोषामुळे फ्रान्ससह अनेक देशांतील सरकारांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.