World Tourism Report : कोरोनाच्या संकटाने जगभरात हाहाकार उडाला होता. या संकटात अनेक देशांची अर्थव्यवस्था ठप्प झाली होती. हॉटेल इंडस्ट्री आणि पर्यटन व्यवसायाला (Tourism Industry) मोठा फटका बसला होता. परंतु आता संकट टळल्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर आली आहे. संयुक्त राष्ट्रांनी (United Nations) सांगितले की मागील वर्षात म्हणजेच 2024 मध्ये ग्लोबल टुरिझम मध्ये मोठी सुधारणा झाली. कोरोनाच्या आधी या व्यवसायात जी भरभराट होती तशीच स्थिती आता निर्माण झाली आहे.
सन 2023 मध्ये 130 कोटी पर्यटकांनी विविध देशांची यात्रा केली. मागील वर्षात हाच आकडा 140 कोटींपर्यंत पोहोचला. ही माहिती संयुक्त राष्ट्रांच्या पर्यटन विभागाने दिली आहे. या वर्षात पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ झालीच शिवाय उत्पन्न देखील चांगले मिळाले. 2024 या वर्षातील उलाढाल 2019 मधील उलाढालीच्या तुलनेत जास्त राहिली. या रिपोर्टमध्ये आणखी काय म्हटले आहे याची माहिती घेऊ या..
नाशिक-कोकणला अच्छे दिन! पर्यटनाच्या समृध्दीसाठी केंद्राकडून मिळाला भरमसाठ निधी
सन 2024 या वर्षात 2023 च्या तुलनेत पर्यटकांच्या संख्येत 11 टक्के वाढ नोंदविण्यात आली. आता 2025 मध्ये सुद्धा हाच ट्रेंड कायम राहणार आहे. मागील वर्षात पर्यटकांनी युरोपला सर्वाधिक पसंती दिली. युरोपातील विविध देशांत तब्बल 75 कोटी पर्यटक भेटी देऊन गेले. युरोपातील पश्चिम, दक्षिण आणि उत्तर भागातील देश आणि तेथील पर्यटन स्थळांकडे पर्यटकांचा कल दिसून आला. मध्य आणि पूर्व युरोपला युक्रेन युद्धाचा (Russia Ukraine War) फटका बसला. या भागात पर्यटकांचा ओढा कमी राहिला.
मागील वर्षात युरोपला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या 2023 या वर्षाच्या तुलनेत पाच टक्के जास्त होती. 2019 मध्ये कोरोनाचे संकट येण्याआधी जी परिस्थिती होती त्यापेक्षा जास्त पर्यटक 2024 मध्ये युरोपात आले होते.
आशिया-पॅसिफिक देश आणि येथील पर्यटन स्थळांना भेटी पर्यटकांची संख्या जवळपास 33 टक्के जास्त राहिली. 2023 च्या तुलनेत येथे एक तृतीयांश पर्यटक जास्त आले. जवळपास 32 कोटी पर्यटकांनी येथील विविध पर्यटन स्थळांना भेटी दिल्या. 2019 च्या तुलनेत हा आकडा 87 टक्क्यांपर्यंतच पोहोचू शकला आहे.
हॅपी ‘फिनलंड’मध्ये वाढतोय उदासपणा.. संयुक्त राष्ट्रांचा हॅपीनेस रिपोर्ट किती खरा?
एल साल्वाडोरमध्ये 2019 या वर्षाच्या तुलनेत 2024 मध्ये 81 टक्क्यांपेक्षा जास्त पर्यटक आले. मोरोक्कोमध्ये पर्यटकांची संख्या 35 टक्के जास्त राहिली. एकूणच लोकांमध्ये भटकंतीची आवड मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कोरोनाच्या आधीच्या तुलनेत आता जास्त लोक फिरायला जात असल्याचे या आकडेवारीवरून दिसून येत आहे. जर इस्रायल-हमास, सुदान आणि युक्रेन रशियाचं युद्ध थांबलं तर आगामी काळात पर्यटकांची संख्या आणखी वाढण्याची दाट शक्यता आहे. आता जो 140 कोटींचा आकडा दिसत आहे त्याच्याही पुढे ही संख्या जाईल असा अंदाज आहे.