पुराच्या तडाख्यात शाळा वाहून गेली, शिक्षकाच्या एका निर्णयाने 1,643 मुलांचे प्राण वाचले

दवाडी यांनी तात्काळ शाळेची घंटा वाजवून सर्व वर्ग रिकामे करण्याचे आदेश शिक्षकांना दिले. विद्यार्थ्यांना डोंगराच्या दिशेने हलवण्यात आले.

Nepalll

पुराच्या तडाख्यात शाळा वाहून गेली, शिक्षकाच्या एका निर्णयाने 1,643 मुलांचे प्राण वाचले

नेपाळमध्ये पुराच्या महाआपत्तीनंतर बचावकार्य सुरू असतानाच एका शिक्षकाच्या प्रसंगावधानाची कहाणी समोर आली आहे. (Nepal) नुवाकोट जिल्ह्यातील त्रिशुली खोऱ्यात आलेल्या भीषण पुरात शाळेची संपूर्ण इमारत वाहून गेली. मात्र, मुख्याध्यापक राजेंद्र दवाडी यांनी वेळीच घेतलेल्या निर्णयामुळे शाळेत उपस्थित असलेल्या तब्बल 1,643 विद्यार्थ्यांचे प्राण वाचले. हजारो नागरिक अद्याप बेपत्ता असून विविध भागांत मदत आणि बचावकार्य सुरू आहे.

त्रिशुली माध्यमिक शाळेची तीन मजली काँक्रीटची इमारत नदीपासून सुमारे 60 मीटर उंचीवर होती. त्यामुळे सुरुवातीला शाळेला तातडीचा धोका नसल्याचे दवाडी यांना वाटत होते. मात्र बुधवारी सकाळी सुमारे 9:20 वाजता एका मित्राचा फोन आला आणि नदीच्या प्रवाहामुळे गाव वाहून गेल्याची माहिती मिळाली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येताच त्यांनी विद्यार्थ्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याचा निर्णय घेतला.

दवाडी यांनी तात्काळ शाळेची घंटा वाजवून सर्व वर्ग रिकामे करण्याचे आदेश शिक्षकांना दिले. विद्यार्थ्यांना डोंगराच्या दिशेने हलवण्यात आले. शाळेच्या बसचालकांनाही त्यांनी फोन करून वाहने माघारी घेण्याच्या सूचना केल्या. मात्र त्यातील एक बस पूल ओलांडण्यापूर्वी थांबवता आली नाही. दरम्यान, पुराचा धोका लक्षात येताच विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले.

97 वर्षीय गुना माया बोहरा ठरल्या नेपाळच्या आपत्तीत ‘आशेचा चेहरा’; मृत्यूच्या तोंडातून योद्ध्यासारख्या परतल्या!

या गोंधळात एका विद्यार्थिनीला भीतीमुळं चक्कर आली. तिला सायकलवरून डोंगरावरील सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलं. इतर विद्यार्थी जीव वाचवण्यासाठी पायी उंच भागाकडं धावले. मात्र मुख्याध्यापक दवाडी स्वतः मागे थांबले आणि एकही विद्यार्थी किंवा शिक्षक शाळेत राहिलेला नाही ना, याची खात्री केली. काही मिनिटांत सर्व विद्यार्थी सुरक्षित ठिकाणी पोहोचले.

विद्यार्थी सुरक्षित स्थळी पोहोचताच पुराच्या पाण्याचा प्रचंड प्रवाह शाळेच्या दिशेने आला आणि पाहता पाहता संपूर्ण इमारत वाहून गेली. काही क्षणांपूर्वी ज्या ठिकाणी 1,643 विद्यार्थी शिक्षण घेत होते, तेथे नंतर केवळ चिखल आणि ढिगारा उरला. दवाडी यांच्या तत्पर निर्णयामुळे जवळपास सर्व विद्यार्थी आणि शिक्षक बचावले. मात्र या दुर्घटनेत दोन सहकाऱ्यांना वाचवता आले नाही.

दरम्यान, नेपाळमध्ये या पुरामुळे 700 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त असून मोठ्या संख्येने नागरिक अद्याप बेपत्ता आहेत. तिबेटच्या पर्वतीय भागातील हिमनदी तुटल्यामुळे आलेल्या प्रचंड पाण्याच्या प्रवाहाने मोठे नुकसान झाले आहे. आता पुन्हा गंभीर पुराचा इशारा देण्यात आल्याने प्रशासन आणि बचाव पथके सतर्क आहेत. या पार्श्वभूमीवर दवाडी यांनी घेतलेला काही मिनिटांचा निर्णय 1,643 विद्यार्थ्यांसाठी अक्षरशः जीवनदायी ठरला आहे.

Exit mobile version