97 वर्षीय गुना माया बोहरा ठरल्या नेपाळच्या आपत्तीत ‘आशेचा चेहरा’; मृत्यूच्या तोंडातून योद्ध्यासारख्या परतल्या!

नेपाळच्या भीषण पुरात 4 तास ढिगाऱ्याखाली अडकूनही 97 वर्षीय गुना माया बोहरा बचावल्या; त्यांची थरारक कहाणी ‘आशेचा चेहरा’ ठरली.

Guna Maya Bohara Nepal Flood Survivor

Guna Maya Bohara Nepal Flood Survivor: नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी पुराने (Nepal Flood) सर्वत्र हाहाकार माजवला असताना एका 97 वर्षीय महिलेच्या जगण्याची कहाणी सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरत आहे. पुराच्या तडाख्यात उद्ध्वस्त झालेल्या केअर होमच्या ढिगाऱ्याखालून तब्बल चार तासांच्या प्रयत्नांनंतर ‘गुना माया बोहरा’ या महिलेचा बचाव करण्यात आला. सध्या त्या रुग्णालयात उपचार घेत असून त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

ढिगाऱ्याखाली अडकल्या आणि चार तासांनी बाहेर आल्या

अचानक आलेल्या पुरामुळे गुना माया बोहरा राहत असलेल्या केअर होमचे मोठे नुकसान झाले. त्या ढिगाऱ्याखाली अडकल्या. परिसरातील परिस्थिती अत्यंत बिकट असतानाही पोलीस आणि नेपाळ लष्कराने त्यांचा शोध सुरू ठेवला.

मोठी बातमी! रशियाचा युक्रेनमध्ये भीषण ड्रोन हल्ला; गोदामात स्फोट, 37 जणांचा मृत्यू, 42 जण जखमी

सुमारे चार तासांच्या बचाव मोहिमेनंतर पथकाला त्यांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात यश आले. ढिगारा हटवण्यासाठी एक्स्कॅव्हेटरचा वापर करण्यात आला. अखेर बोहरा यांना त्या मशीनच्या बकेटमध्येच बसवून सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आणि त्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले.

‘त्या योद्ध्यासारख्या दिसत होत्या…’

बोहरा यांच्या सुटकेनंतरचा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला. चिखलाने माखलेले कपडे, थकलेला चेहरा आणि एक्स्कॅव्हेटरच्या बकेटमध्ये बसलेल्या 97 वर्षीय बोहरा यांचा फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला.

ठेवी 384 कोटींच्या अन् कर्ज वितरण 423 कोटींचे; मुरकुटेंशी निगडीत अशोक बँकेवर आरबीआयचे निर्बंध

त्यांचा नातेवाईक दीपक बोहरा काठमांडूहून बचाव मोहिमेत सहभागी होण्यासाठी घटनास्थळी पोहोचला होता. त्याने बोहरा यांची तुलना युद्धातून विजयी होऊन परतलेल्या ‘योद्ध्या’शी केली.

‘त्या जिवंत आहेत’ हे कळताच आशेचा किरण

दीपक यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या कुटुंबातील काही सदस्य झाडांना दोर बांधून पुराच्या पाण्यातून पुढे गेले होते. त्यावेळी ढिगाऱ्याखाली गुना माया अजूनही जिवंत असल्याचे समोर आले. त्या क्षणी सुरू झालेली त्यांच्या बचावाची धडपड अखेर त्यांच्या सुखरूप सुटकेनेच संपली.

OBC आंदोलकांना आझाद मैदान पोलिसांनी परवानगी नाकारली; तरीही हाकेंचा मुंबईला जाण्याचा इशारा

इतक्या मोठ्या आपत्तीमध्ये 97 वर्षांच्या महिलेचे अशा प्रकारे जिवंत सापडणे हे बचाव पथकांसाठीही आश्चर्यकारक ठरले. त्या इतका वेळ कशा वाचल्या, याचे उत्तर मात्र स्वतः बोहराही देऊ शकलेल्या नाहीत.

नेपाळच्या आपत्तीत ‘आशेचा चेहरा’

नेपाळमध्ये भीषण पुरामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली असून अनेक लोक बेपत्ता आहेत. अशा परिस्थितीत गुना माया बोहरा यांची सुटका ही या आपत्तीतील दुर्मीळ सकारात्मक गोष्ट ठरली आहे.

धनंजय महाडिकांचा सतेज पाटलांना टोला; “यंदा गोकुळची दहीहंडी महायुतीच फोडणार,”

ढिगाऱ्याखालून बाहेर काढल्यानंतर एक्स्कॅव्हेटरच्या बकेटमध्ये बसलेल्या त्यांच्या छायाचित्राने या आपत्तीला एक मानवी चेहरा मिळाला आहे. मृत्यूच्या तोंडातून 97 व्या वर्षी त्यांनी केलेली ही ‘वापसी’ आता नेपाळमधील सर्वात हृदयस्पर्शी बचावकथांपैकी एक ठरत आहे.

follow us