नेपाळवरील महापुराचं संकट भीषण, मृतांचा आकडा पोहचला 392 वर, 1200 जण बेपत्ता
महापुरामुळं नेपाळमध्ये आतापर्यंत 392 जणांचा मृत्यू झाला असून 1200 हून अधिक नागरिक बेपत्ता आहेत.
नेपाळमध्ये आलेल्या भीषण महापुराने (Nepal) मोठ्या प्रमाणात विध्वंस केला असून अनेक नागरिक बेघर झाले आहेत. पूरग्रस्त भागात बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, संकट अद्याप टळलेलं नाही. भारताकडून नेपाळला मोठ्या प्रमाणात मदत केली जात असून भारतीय नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. भारताने नेपाळमध्ये प्रत्यक्ष बचावकार्य राबवण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, नेपाळने हा प्रस्ताव नाकारून आर्थिक मदतीला प्राधान्य दिले आहे. अमेरिकेनेही नेपाळला मदत करण्याची तयारी दर्शवली आहे.
महापुरामुळं नेपाळमध्ये आतापर्यंत 392 जणांचा मृत्यू झाला असून 1200 हून अधिक नागरिक बेपत्ता आहेत. बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्यासाठी बचाव पथकांकडून मोहीम सुरू आहे. भारतातील 290 नागरिकांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र, त्यापैकी काही नागरिकांशी अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही. महाराष्ट्रातील 114 नागरिकही नेपाळमध्ये अडकले असून त्यापैकी 53 जण सुखरूप असल्याची माहिती समोर आली आहे. मानसरोवर परिसरात काही नागरिक सुरक्षित असल्याचंही सांगण्यात येत आहे.
एकीकडं महापुराचा धोका कायम असतानाच नेपाळसमोर आणखी एका नैसर्गिक संकटाची शक्यता निर्माण झाली आहे. चीनच्या सीमेजवळील एका बॅरिअर लेकमधून मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडण्याचा धोका असल्याचा इशारा चीनकडून देण्यात आला आहे. ग्लेशियरचा खालचा भाग तुटून सुमारे 1200 मीटर खाली दरीत कोसळल्याची माहिती शास्त्रज्ञांनी दिली आहे. हा भाग ल्हेंदे खोला नदीत कोसळल्याने परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नेपाळमध्ये पुन्हा मोठ्या महापुराचा धोका निर्माण होऊ शकतो
दरम्यान, पुरामुळं अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली असून अनेक जण आपल्या नातेवाईकांपासून दुरावले आहेत. बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्यासाठी त्यांचे कुटुंबीय रुग्णालये आणि मृतदेह ओळख केंद्रांच्या फेऱ्या मारत आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात असून नेपाळमधील बचावकार्याला मोठं आव्हान निर्माण झालं आहे. अडकलेल्या भारतीय नागरिकांशी सातत्याने संपर्क साधला जात असून काही नागरिक सुरक्षित हॉटेलमध्ये असल्याची माहितीही प्रशासनाकडून मिळत आहे.