Download App

मुसळधार पावसाचा कहर! मृतांचा आकडा 30 पार, 80 हजाराहून अधिक नागरिकांचे स्थलांतर

Heavy Rains Floods In China : चीनची राजधानी (China) बीजिंग आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस (Heavy Rain) सुरू आहे. त्यामुळे भीषण पूरस्थिती (Floods) निर्माण झाली आहे. या नैसर्गिक संकटात आतापर्यंत किमान 30 लोकांनी प्राण गमावले असून, अनेकजण अजूनही बेपत्ता आहेत. राजधानीच्या उत्तरेकडील मियुन आणि यानकिंग जिल्ह्यांत सर्वाधिक हानी झाली आहे.

हजारो नागरिकांचे स्थलांतर

चिनी प्रसारमाध्यमांच्या माहितीनुसार, बीजिंगमधून 30,000 लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे, तर संपूर्ण प्रदेशात मिळून 80,000 हून अधिक नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. मुसळधार पावसामुळे रस्ते खचले असून, किमान 136 गावांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. बळीराज्याचा हकनाक मृत्यू टाळण्यासाठी आणि बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्यासाठी मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

पाकचं पाणी बंद मग क्रिकेटचे सामने का? औवेसींचा सरकारला संतप्त सवाल

देशाचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी अधिकाऱ्यांना तातडीने मदत पोहोचवण्याचे आणि स्थलांतरित नागरिकांसाठी योग्य निवासस्थानांची व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत. मृतांची संख्या वाढू नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचेही निर्देश त्यांनी दिले आहेत.

मियुनमध्ये सर्वाधिक नुकसान

राज्य प्रसारक सीसीटीव्हीने दिलेल्या माहितीनुसार, मियुन जिल्ह्यात 28 जणांचा मृत्यू झाला आहे, तर यानकिंग जिल्ह्यात 2 लोकांचे मृतदेह सापडले आहेत. याशिवाय, हेबेई प्रांतात भूस्खलनामुळे 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. पुरामुळे वाहने वाहून गेली असून, वीजखांब कोसळले आहेत. परिणामी मृतांची एकूण संख्या किमान 34 वर पोहोचली आहे. तैशिटुन शहरासह अनेक गावांत रस्ते जलमय झाले असून, घरांमध्ये पाणी घुसले आहे. बांधकाम साहित्य विकणाऱ्या झुआंग झेलिन यांनी सांगितले की, पूर इतका अचानक आला की काही क्षणात परिसर बुडाला.

..नाहीतर थेट निलंबन! राज्य सरकारचा मोठा निर्णय; कर्मचाऱ्यांना सोशल मीडियासाठी नियमाची ‘चौकट’

आपत्कालीन स्थिती जाहीर

बीजिंग प्रशासनाने सोमवारी रात्री 8 वाजता उच्चस्तरीय आपत्कालीन प्रतिक्रिया पथक सक्रिय केले आहे. नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे, शाळा बंद ठेवण्याचे, बांधकाम आणि पर्यटन बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार, बीजिंगमध्ये आजही मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागांत 30 सेंटीमीटरपर्यंत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे सखल भागांपासून दूर राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. मियुन जिल्ह्यातील जलाशयात पाण्याची पातळी 1959 पासूनच्या सर्वाधिक स्तरावर पोहोचली असून, तिथून नियंत्रित पद्धतीने पाणी सोडण्यात आले आहे.

 

follow us