Indian dies from missile debris : अबूधाबीमध्ये हवाई संरक्षण यंत्रणांनी अडवलेल्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राच्या अवशेषांमुळे झालेल्या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून त्यात एका भारतीय नागरिकाचा समावेश आहे. या घटनेत आणखी एक भारतीय जखमी झाला आहे. अबूधाबी मीडिया ऑफिसने सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार, हवाई संरक्षण प्रणालीने यशस्वीरीत्या अडवलेल्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रानंतर पडलेल्या अवशेषांमुळे ही घटना घडली. या दुर्घटनेत पाकिस्तान आणि भारतातील प्रत्येकी एक व्यक्ती मृत्युमुखी पडली असून, एमिराती, जॉर्डनियन आणि भारतीय नागरिकांसह तिघे जखमी झाले आहेत. जखमींची प्रकृती गंभीर ते मध्यम स्वरूपाची असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, संयुक्त अरब अमिरातीतील भारतीय दूतावासाने या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. अबूधाबीमध्ये पडलेल्या अवशेषांमुळे एका भारतीय नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याबद्दल आम्ही मनःपूर्वक शोक व्यक्त करतो. दूतावास यूएई प्रशासनाशी समन्वय साधत असून सर्वतोपरी मदत केली जाईल, असे दूतावासाने म्हटले आहे. ही घटना अबूधाबीतील स्वीहान स्ट्रीटवर घडली. हवाई संरक्षण यंत्रणांनी क्षेपणास्त्र अडवल्यानंतर त्याचे अवशेष खाली पडल्याने ही दुर्घटना घडली. या घटनेत काही वाहनांचे नुकसान झाले असून, घटनास्थळी तात्काळ आपत्कालीन पथके दाखल झाली.
महसूल विभागात खळबळ! 13 अतिगंभीर प्रकरणांत दोषी अधिकाऱ्यांना सक्तीची रजा
अबूधाबी प्रशासनाने नागरिकांना अफवा न पसरवण्याचे आवाहन केले आहे. माहिती केवळ अधिकृत स्रोतांकडूनच घ्यावी आणि अप्रमाणित बातम्या किंवा अफवा पसरवू नयेत, असे आवाहन करण्यात आले. याआधी यूएईच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले होते की, इराणकडून येणाऱ्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी हवाई संरक्षण यंत्रणा कार्यरत आहेत. लोकांना ऐकू येणारे आवाज हे क्षेपणास्त्र आणि ड्रोन अडवताना निर्माण झालेले आहेत, असे मंत्रालयाने स्पष्ट केले.
दरम्यान, सुरू असलेल्या संघर्षात यूएईमधील मृतांचा आकडा 11 वर पोहोचला आहे. संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, आतापर्यंत 357 बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे, 15 क्रूझ क्षेपणास्त्रे आणि 1,815 मानवरहित विमान अडवण्यात आले आहेत. बुधवारीपर्यंत 166 जण जखमी झाले असून, यात अनेक परदेशी नागरिकांचा, त्यात भारतीयांचाही समावेश आहे.
