होर्मुझच्या सामुद्रधुनीत यूएईच्या जहाजांवर इराणी हल्ला; एका भारतीय कर्मचाऱ्याचा मृत्यू!

होर्मुझच्या सामुद्रधुनीत यूएईच्या जहाजांवर झालेल्या इराणी हल्ल्यात एका भारतीय कर्मचाऱ्याचा मृत्यू, तर सहा भारतीयांसह एकूण आठ जण जखमी झाले.

  • Written By: Published:
Iran Attack

Iranian attack on UAE ships in the Strait of Hormuz; one Indian crew member killed: पश्चिम आशियातील संघर्षात मोठी वाढ होत असताना, आज (14 जुलै) ओमानजवळील होर्मुझच्या सामुद्रधुनीत यूएईच्या (संयुक्त अरब अमिराती) जहाजांवर झालेल्या इराणी हल्ल्यात एका भारतीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला, तर सहा भारतीयांसह एकूण आठ जण जखमी झाले.

यूएईच्या संरक्षण मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, ओमानच्या सागरी हद्दीत होर्मुझच्या सामुद्रधुनीतील (Strait of Hormuz) दक्षिण जलमार्गावरून जात असताना त्यांच्या ‘मोम्बासा’ आणि ‘अल बाहिया’ या जहाजांना दोन इराणी क्रूझ क्षेपणास्त्रांनी लक्ष्य केले. मंत्रालयाने सांगितले की, ‘मोम्बासा’ जहाजावरील एका भारतीय कर्मचाऱ्याचा (Indian Crew Member) मृत्यू झाला असून इतर आठ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी चौघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींमध्ये सहा भारतीय आणि दोन युक्रेनियन नागरिकांचा समावेश असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले. यूएईच्या संरक्षण मंत्रालयाने या “उघड हल्ल्याचा” निषेध केला आणि याला “आंतरराष्ट्रीय कायद्याचे गंभीर उल्लंघन” मानले.

“या वाढत्या तणावाला प्रत्युत्तर देण्याचा आणि आपल्या प्रदेशाचे, तसेच नागरिक व रहिवाशांचे रक्षण करण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्याचा पूर्ण अधिकार यूएई राखून ठेवते,” असेही मंत्रालयाने म्हटले. कोणत्याही धोक्याचा सामना करण्यासाठी आपण “सर्वोच्च पातळीवरील सज्जता” बाळगून असल्याचेही मंत्रालयाने सांगितले.

होर्मुझच्या सामुद्रधुनीत इराणवर पुन्हा नाकेबंदी लागू करत असल्याचे आणि सुरक्षित प्रवासासाठी इतर जहाजांकडून शुल्क आकारले जाईल असे संकेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) दिल्यानंतर, मंगळवारी पहाटे अमेरिकेने (America) इराणवर हल्ले केले. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने बहरीन, जॉर्डन आणि यूएईशी संबंधित दोन जहाजांवर हल्ले केले.

पश्चिम आशियातील या संघर्षात आतापर्यंत 11 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या संघर्षात जहाजे आणि टँकर्सवर हल्ले होत असताना अनेक खलाशांची सुटका करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात, पलाऊचा ध्वज असलेल्या ‘एमटी सेटेबेलो’ (MT Settebello) या जहाजावर अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात तीन भारतीय खलाशी मारले गेले होते.

follow us