Mohammad Yunus: बांगलादेशात अंतरिम सरकार स्थापन, अर्थतज्ज्ञ मोहम्मद युनूस नेतृत्व करणार
र्थतज्ज्ञ मोहम्मद यूनुस हे बांगलादेशातील अंतरिम सरकारचे प्रमुख झाले. तिन्ही सेनाप्रमुख आणि विद्यार्थांनी हा निर्णय घेतला.
ganesh pokale
Bangladesh News
Bangladesh violence : अर्थतज्ज्ञ मोहम्मद यूनुस हे बांगलादेशातील अंतरिम सरकारचे प्रमुख झाले. तिन्ही सेनाप्रमुख आणि विद्यार्थी नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. (Mohammad Yunus) मोहम्मद युनूस यांना पंतप्रधानपदाचा दर्जा असणार आहे. नवीन सरकार स्थापन होईपर्यंत मोहम्मद युनूस सरकारचे नेतृत्व करतील. सरकारचा नेता निवडण्यासाठी अध्यक्ष मोहम्मद शहाबुद्दीन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत तिन्ही लष्करप्रमुख उपस्थित होते. या बैठकीला विद्यार्थी संघटनांचे नेतेही उपस्थित होते.
नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांची सरकारचे नेते म्हणून एकमताने निवड करण्यात आली. मोहम्मद युनूस हे बांगलादेशातील गरिबांचे बँकर म्हणून ओळखले जातात. मोहम्मद युनूस यांना अंतरिम सरकारचे प्रमुख करण्यासंदर्भातील प्रस्ताव बांगलादेशमधील आंदोलक विद्यार्थ्यांनी दिला होता. त्यांचा हा प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे. त्यानुसार आता मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वात अंतरिम सरकार स्थापन होणार आहे. मोहम्मद युनूस हे शेख हसीना यांचे कट्टर विरोधक आहेत.
८४ वर्षांचे डॉ. युनूस अंतरिम सरकारचा कार्यभार स्वीकारणार असल्याचं सांगितलं आहे. यावेळी त्यांनी देश सोडून पळून गेलेल्या शेख हसीना यांच्यावरही जोरदार घणाघात केला. युनूस म्हणाले, आज देश स्वतंत्र झाला. शेख हसीना यांच्या कार्यकाळापर्यंत इथे लोकं गुलामासारखे जीवन जगत होते. शेख हसीना यांची वागणूक हुकूमशाहीसारखी होती. त्यांना संपूर्ण देशावर नियंत्रण ठेवायाचं होतं. आज देशातील जनतेची खऱ्या अर्थाने सुटका झाल्यासारखं वाटत आहे.
तरुण देशाला योग्य दिशेने घेऊन जातील
अवामी लीग सरकारच्या काळामध्ये डॉ. युनूस यांच्यावर १९० गुन्हे दाखल करण्यात आले होते. शेख हसीना यांनी त्यांचे वडील शेख मुजीबर रहमान यांचा वारसा नष्ट केल्याचं डॉ. युनूस यांनी सांगितलं. बांगलादेशामध्ये सुरू असलेल्या अशांततेचेही त्यांनी समर्थन केलं. आज आंदोलनक आपला राग काढत आहेत. आज उपद्रव करणारे हेच विद्यार्थी आणि तरुण देशाला योग्य दिशेने घेऊन जातील अशी आशा आहे. शेख हसीना निवडणुकीमध्ये हेराफेरी करायच्या. त्यांनी अशी परिस्थिती निर्माण केली होती की त्यांना राजकीय प्रतिसाद देणे कठीण झालं होत असंही ते यावेळी म्हणाले आहेत.
शांततेचा नोबेल पुरस्कार
गरीब जनतेला बँकिंग सुविधा देण्याच्या युनूसच्या प्रयोगामुळे बांगलादेशला सूक्ष्म कर्जाचं केंद्र म्हणून ओळख मिळाली. युनूस सध्या देशाबाहेर आहेत. परंतु, त्यांनी शेख हसीनांच्या हकालपट्टीचं स्वागत केलं आणि या विकासाला देशाची ‘दुसरी मुक्ती’ असं म्हटलं आहे. ग्रामीण बँकेच्या माध्यमातून दारिद्र्य निर्मूलन मोहिमेसाठी युनूस यांना २००६ मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला होता. त्यांची पद्धत वेगवेगळ्या खंडात अवलंबली गेली आहे.