Israel Hamas War : इस्त्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्यातील युद्ध (Israel Hamas War) अजूनही सुरुच आहे. हमासच्या अतिरेक्यांनी इस्त्रायलमध्ये रॉकेट हल्ले करत युद्धाला सुरुवात करून दिली. त्यानंतर खवळलेल्या इस्त्रायलने सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. या युद्धात संपूर्ण गाझा पट्टी (Gaza) उद्धवस्त झाली आहे. आता इस्त्रायलने येथील पाणी, इंधन, वीज पुरवठा सगळं काही बंद केले आहे. अमेरिकेच्या पुढाकारानंतर आता येथील लोकांना काही प्रमाणात मदत मिळत आहे. मात्र, दहशत कमी झालेली नाही. इस्त्रायलचे सैन्य जमिनीवरून हल्ले करण्यासाठी सज्ज झाले आहे. आता इस्त्रायलने उत्तर गाझा रिकामा करण्यासाठी निर्वाणीचा इशारा दिला आहे. उत्तर गाझातील नागरिकांनी हा भाग तत्काळ रिकामा करावा नाहीतर त्यांनाही दहशतवाद्यांचे साथीदार समजून नष्ट केले जाईल असा इशारा इस्त्रायलच्या लष्कराने दिला आहे.
Terrorist : पाकिस्तानमध्ये जैशचा प्रमुख मसूद अझहरच्या साथीदाराची हत्या; दहशतवादी दाऊद मलिक ठार
लष्कराने पुढे असेही म्हटले आहे की हा तातडीचा इशारा आहे. तुम्ही उत्तर गाझात राहून आपला जीव धोक्यात घालत आहात. जे नागरिक या भागातून दक्षिणेकडे स्थलांतरीत होणार नाहीत त्यांना थेट दहशतवादी मानले जाईल. आम्हाला कोणत्याही परिस्थितीत नागरिकांचा मृत्यू नको आहे. त्यामुळेच याआधी सलग इशारे देण्यात आले होते. परंतु, आता हा अंतिम इशारा मानला जावा असे स्पष्ट केल्याने भीती वाढली आहे.
इस्त्रायलच्या लष्कराने निवेदनाद्वारे हा इशारा दिला आहे. लष्कराने याआधीही असे इशारे अनेकदा दिले होते. मात्र, त्याचा काही परिणाम झाला नाही. लोकांनी उत्तर गाझा सोडले नाही. याआधी जे नागरिक उत्तरेतून दक्षिण गाझात स्थलांतरीत झाले ते सगळे मारले गेले असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे त्यामुळे त्यांच्याकडून उत्तर गाझा सोडण्यास टाळाटाळ केली जात आहे. तर दुसरीकडे इस्त्रायलच्या लष्कराने सांगितले आहे की त्यांच्याकडून कधीही नागरिकांना लक्ष्य केले गेले नाही. ज्या ठिकाणी दहशतवादी होते तेथेच हल्ले करण्यात आले.
इस्त्रायलचा प्लॅन नेमका काय ?
इस्त्रायलने या युद्धात आता आधिक आक्रमक भूमिका घेतली आहे. गाझा शहराचा ताबा घेण्यासाठी आणि गाझा पट्टी उद्धवस्त करण्यासाठी 10 हजार सैन्य पाठविण्याची योजना आखण्यात आली आहे. न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, इस्त्रायली लष्करी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने ही माहिती देण्यात आली आहे. 2006 च्या लेबनॉन युद्धानंतरचं हे सर्वात मोठं युद्ध असेल असे या अहवालात म्हटले आहे.
Israel Palestine War : गाझातील नागरिकांना 3 तासांची डेडलाईन; इस्त्रायलने नेमकं काय केलं ?
गाझासाठी अमेरिकेकडून मोठी मदत
गाझा आणि वेस्ट बँकमध्ये मानवता मदतीसाठी त्यांनी 100 मिलियन डॉलर्स (832 कोटी रुपये) मदतीची घोषणा केली. यामुळे दहा लाखांहून अधिक विस्थापित झालेल्या पॅलेस्टिनी नागरिकांना मदत मिळेल. अमेरिकेचे अध्यक्ष मागील आठवड्यात इस्त्रायलमध्ये आले होते. येथे त्यांनी इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यनाहू यांची भेट घेतली. युद्धाच्या परिस्थितीचा आढावाही घेतला होता.