France Protests : नेपाळमध्ये हिंसाचाराची आग भडकलेली असतानाच आता अशीच बातमी युरोपातील देश फ्रान्समधून आली आहे. फ्रान्सचे पंतप्रधान बायरू यांना पदावरून हटवून राष्ट्रपती इमॅन्यूएल मॅक्रों यांनी त्यांचे निकटवर्तीय सेबेस्टियन लेकोर्नू यांना पंतप्रधानपदी नियुक्त केले. परंतु, त्यांचा हाच फ्रान्सला हिंसाचाराच्या आगीत ढकलणारा ठरला. या निर्णयानंतर फ्रान्समध्येही जोरदार आंदोलन सुरू झालं आहे.
दोन वर्षात पाचवे पंतप्रधान म्हणून लेकोर्नू यांची (France Protests) नियुक्ती झाली आहे. मात्र मॅक्रो यांचा हा निर्णय विरोधकांच्या पचनी पडलेला नाही. त्यांची नियुक्ती अशा वेळी झाली आहे जेव्हा देशात आर्थिक संकटामुळे लोक रस्त्यावर उतरले आहेत. राष्ट्रपती मॅक्रो यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. यातच मॅक्रो यांनी पंतप्रधान म्हणून लेकोर्नू यांची घोषणा करताच या आंदोलनाचा भडका उडाला. पोलिसांनी आतापर्यंत 200 आंदोलकांना अटक केली असून परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
फ्रान्सच्या नॅशनल असेंबलीने सोमवारी देशावरील कर्जाचं संकट दूर करण्यासाठी बजेटमध्ये 51 बिलियन डॉलर्सच्या कपातीचा प्रस्तावावर पंतप्रधान बायरू यांना हटवण्यासाठी मतदान केले होते. यानंतर देशभरात निदर्शने सुरू झाली. आंदोलक राष्ट्रपती मॅक्रो यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. आंदोलन अधिकाधिक उग्र होत चालले आहे. आंदोलकांनी अनेक ठिकाणी जाळपोळ केली आहे. या जाळपोळीचे व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. येथील परिस्थिती अधिक चिघळू नये यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत.
Block Everything म्हणजे काय ?
राष्ट्रपती मॅक्रो यांचं नेतृत्व आणि आर्थिक धोरणांवर आंदोलक कमालीचे नाराज आहेत. यासाठी त्यांनी आता देशातील सरकारचे कामकाज बंद करण्याची योजना तयार केली आहे. आज सुरू झालेल्या या आंदोलनात पॅरिस शहरात पोलीस आणि आंदोलकांत झटापट झाली. आंदोलकांनी शहरात अनेक ठिकाणी जाळपोळ केली. सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान केले. आंदोलक Block Everything अशा घोषणेखाली पूर्ण देशात निदर्शने करत आहेत. या आंदोलनांना आटोक्यात आणण्यासाठी सरकारने 80 हजार पोलिसांना तैनात केले आहे.
मॅक्रो राजीनामा देणार का ?
देशात सुरू असलेल्या या आंदोलनांवर राष्ट्रपती मॅक्रो यांची प्रतिक्रिया आली आहे. मी कोणत्याही परिस्थितीत राजीनामा देणार नाही असे त्यांनी सांगितले. विरोधक फक्त सत्तेसाठी हपापलेले आहे आणि बेजबाबदार आहेत असा आरोप त्यांनी विरोधकांवर केला. दरम्यान, फ्रान्सचे गृहमंत्री ब्रूनो रिटेलो यांनीही या आंदोलनाची कठोर शब्दांत निंदा केली. आंदोलक देशात विद्रोहाचे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप रिटेलो यांनी केला.