AI News : कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI तंत्रज्ञानाचा वेगाने विस्तार होत आहे. त्याच्या संभाव्य धोक्यांबाबत जगभरात चर्चा सुरू आहे. मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स (Microsoft co-founder Bill Gates) यांनी AI बाबत अत्यंत गंभीर इशारा दिलाय. योग्य नियमन आणि सुरक्षा व्यवस्था नसेल तर AI च्या गैरवापरातून मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होऊ शकते, असा इशारा त्यांनी दिला आहे.
NBC News ला दिलेल्या मुलाखतीत बिल गेट्स यांनी हा इशारा दिला आहे. AI इतके शक्तिशाली आहे की त्याच्या माध्यमातून अशा घटना घडवून आणल्या जाऊ शकतात. ज्यामुळे एक अब्ज लोकांचा मृत्यू होण्याइतकी परिस्थिती निर्माण होऊ शकते. गेट्स यांच्या मते, AI च्या क्षमतेकडे केवळ तंत्रज्ञानाच्या प्रगतीच्या दृष्टीने पाहता कामा नये. चुकीच्या हेतूने काम करणाऱ्या व्यक्ती किंवा गटांच्या हाती अत्याधुनिक AI साधने गेल्यास त्याचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर होण्याचा धोका आहे.
दुष्काळवर चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवा; 17 मागण्यांचे शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
सरकारने AI वर लक्ष ठेवण्याची गरज
AI क्षेत्रातील कंपन्यांनी स्वतःहून सुरक्षेच्या उपाययोजना करण्याबरोबरच सरकार आणि कायदा अंमलबजावणी यंत्रणांनीही या चर्चेत सक्रियपणे सहभागी होण्याची गरज असल्याचे गेट्स यांनी म्हटलंय. AI च्या वापरासाठी कोणते सुरक्षा नियम असावेत, त्यावर देखरेख कशी ठेवली जावी आणि संभाव्य गैरवापर रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात, यासाठी कायदेशीर चौकट आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. अशा नियमांमुळे उद्योगावर काही अतिरिक्त जबाबदारी येईल; मात्र त्यामुळे AI क्षेत्राच्या प्रगतीला मोठा अडथळा निर्माण होणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.
पुढील पाच वर्षांत ‘सुपरइंटेलिजंट’ AI?
गेट्स यांच्या वक्तव्यानंतर काही दिवस आधी ब्रिटनमधील Alan Turing Institute नेही AI च्या संभाव्य धोक्यांबाबत गंभीर निरीक्षणे नोंदवली आहेत. 23 सप्टेंबर रोजी प्रकाशित झालेल्या अहवालात पुढील पाच वर्षांत मानवी क्षमतेपेक्षा अनेक महत्त्वाच्या बौद्धिक कामांमध्ये अधिक सक्षम ठरणारी ‘सुपरइंटेलिजंट’ AI प्रणाली विकसित होण्याची वास्तववादी शक्यता असल्याचे नमूद करण्यात आले आहे. अशा प्रणालींच्या निर्णयक्षमतेवर मानवी संस्थांना पुरेसे नियंत्रण ठेवता आले नाही, तर परिस्थिती गंभीर होऊ शकते, अशी चिंता अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.
जैविक आणि रासायनिक धोक्यांचीही चिंता
AI चा संभाव्य धोका केवळ चुकीची माहिती किंवा तंत्रज्ञानाच्या गैरवापरापुरता मर्यादित नसल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. AI च्या माध्यमातून रासायनिक आणि जैविक धोक्यांना चालना मिळू शकते. तसेच माहितीच्या विश्वासार्हतेवर आणि लोकशाही व्यवस्थेवरही त्याचा परिणाम होऊ शकतो.
दरम्यान Anthropic चे CEO Dario Amodei यांच्यासह AI क्षेत्रातील काही तज्ज्ञांनीही अत्याधुनिक AI च्या विकासावर सुरक्षा उपाययोजना अधिक मजबूत करण्याची गरज व्यक्त केलीय. काही संशोधकांनी भविष्यात AI मुळे मानवजातीसमोर अत्यंत गंभीर धोके निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. AI तंत्रज्ञानाचा विकास सुरूच असताना नवीन तंत्रज्ञानाची क्षमता आणि त्यापासून निर्माण होणारे संभाव्य धोके यांच्यात संतुलन राखणे, हे सरकार, तंत्रज्ञान कंपन्या आणि संशोधकांसमोरील मोठे आव्हान ठरत आहे.
