Download App

राष्ट्रवादीच्या एका खासदाराचे सदस्यत्व रद्द, शरद पवारांना धक्का

नवी दिल्ली : लोकसभा सचिवालयाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका खासदाराचे सदस्तत्व रद्द केले आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची लोकसभेतील सदस्य संख्या एकाने कमी झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. यासंदर्भातील अधिसूचनाही काढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार मोहम्मद फैजल यांना अपात्र ठरवले आहे.

फैजल यांना न्यायालयाने हत्येचा प्रयत्न करण्याच्या प्रकरणात दोषी ठरवले होते. या प्रकरणात त्यांना दहा वर्षांची शिक्षा झाली. यामुळे फैजल याचं ११ जानेवारीपासून लोकसभेच्या सदस्यत्व रद्द करण्यात आल्याची माहिती लोकसभा सचिवालयानं दिली आहे.

लक्षद्वीपच्या न्यायालयाने मोहम्मद फैजल यांच्यासह चार जणांना हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा दिली. न्यायलयाच्या या निकालानंतर लोकसभा सचिवालयाने अधिसूचना काढली.

त्यात म्हटले आहे की, कावरट्टी येथील सत्र न्यायालयाने दोषी ठरवल्याच्या तारखेपासून ११ जानेवारीपासून लोकसभेच्या सदस्यत्वासाठी अपात्र ठरवले आहे.

हा निर्णय भारतीय राज्यघटनेच्या कलम १०२ (१)(ई) आणि लोकप्रतिनिधी कायदा, १९५१ च्या कलम ८ मधील तरतुदीप्रमाणे घेतला आहे. मोहम्मद फैजल १६ व्या लोकसभेत निवडून आले होते. त्यांनी मुहम्मद हमदुल्ला सईद यांना पराभूत केले होते.

माजी केंद्रीय मंत्री पीएम सईद यांचे जावई मोहम्मद फैजलवर काँग्रेस नेते मोहम्मद सलिया यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. मोहम्मद सलिया यांच्यावर जमावाने हल्ला केला आणि बेदम मारहाण केली. त्यात ते गंभीर जखमी झाले.

फैजल यांनीच जमावाचे नेतृत्व केल्याचा आरोप होता. मोहम्मद सलिया यांच्यावर अनेक महिन्यांपासून उपचार सुरू होते. या प्रकरणात ३२ जणांना आरोपी केले होते. त्यापैकी चार जणांना दोषी ठरवले त्यात मोहम्मद फैजलचाही समावेश होता.

राष्ट्रवादी काँग्रेस गुंडांचा पक्ष
लक्षद्वीपचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार मोहम्मद फैजल यांना लोकसभेतून कायमस्वरूपी अपात्र ठरवण्यात आले आहे. लक्षद्वीपच्या न्यायालयाने फैजलला 2009 ला हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी 10 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा दिली. राष्ट्रवादी काँग्रेस हा गुंडांचा पक्ष आहे हेच सिद्ध झालं, असे भाजपने म्हटले आहे.

Tags

follow us