नवी दिल्ली : 31 डिसेंबरच्या रात्री देशभरात नव्या वर्षाचं स्वागत जल्लोषात, फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये करण्यात आलं. जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी आणि महाराष्ट्र ते पश्चिम बंगाल संपूर्ण देशभरात नव्या वर्षाचं जल्लोषात धुमधडाक्या करण्यात आलं. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटनस्थळावर गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय. शिवाय अनेकांनी मंदिरात जाऊन 2022 वर्षाला निरोप दिला अन् नव्या वर्षासाठी नवा संकल्प केला आहे.
मुंबई, पुणे, दिल्ली, मनाली, गोवा, कोलकाता, चेन्नईसह देशभरातील सर्वच शहरात नव्या वर्षाचं स्वागत धुमधडाक्यात केलं. नागरिकांनी 2022 ला निरोप देत 2023 चं मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात स्वागत केलं. त्या त्या ठिकाणचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत.
पुणे, मुंबई, नागपूरसह राज्यभरात नव्या वर्षाचं स्वागत जल्लोषात करण्यात आलं. मुंबईमध्ये ठिकठिकाणी लोक रस्त्यावर जमल्याचं पाहायला मिळालं. ठीक रात्री 12 वाजता मरीन ड्राईव्हवर आतषबाजी झाली अन् नागरिकांनी एकच जल्लोष करण्यास सुरुवात झाल्याचं पाहायला मिळालं.
2023 च्या स्वागतासाठी अनेकांनी पर्यटनस्थळावर गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. लोणावळा, खंडाळा, माथेरान, कोकण, गोवा, मनाली, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर यासह विविध पर्यटन स्थळावर गर्दी झाल्याचं दिसून आलं. तीन वर्षानंतर कोरोनाचा जोर ओसरला, त्यामुळं सर्वजण नव्या वर्षाच्या स्वागतासाठी घराबाहेर पडल्याचं दिसून आलं. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेकांनी मंदिरात जाणं पसंत केलं. तुळजापूर, शिर्डी, पंढरपूर, कोल्हापूर यासह राज्यातील विविध मंदिरात गर्दी केली होती. देवाचं दर्शन घेत अनेकांनी 2022 वर्षाला निरोप दिला.