नवी दिल्ली : नवीन वर्षाचं स्वागत उत्साहात झाल्याचं पाहायला मिळतंय. अबालवृद्धांनी मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात नवीन वर्षाचं स्वागत केलं. आजपासून म्हणजेच या नवीन वर्षात अनेक व्यावसायिक क्षेत्रांत काही बदल होणार आहेत. या बदलांचा परिणाम थेट आपल्या खिशावर होणार आहे. 1 जानेवारी 2023 पासून बँकिंग, विमा, पोस्ट ऑफिस आदी अनेक क्षेत्रांत मोठे बदल होणार आहेत. याचा परिणाम आपल्या बजेटवर होणार आहे. जाणून घेऊया नक्की काय नियम बदलणार?
बँका बंद
नवीन वर्षाला सुरुवात होण्याआधीच आरबीआयने जानेवारी 2023 च्या बँक सुट्ट्यांची यादी जारी केली होती. त्यानुसार नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात अर्थात जानेवारी 2023 मध्ये एकूण 14 दिवस बँका बंद राहणार आहेत. विविध राज्यांमध्ये साप्ताहिक सुट्यांपासून आणि सणांनिमित्त 14 दिवस बँकांना सुट्ट्या असतील.
वाहने महागणार
नवीन वर्षात कार घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्या खिशावरील बोजा आणखी वाढणार आहे. मारुती, किया, टाटा मोटर्स, मर्सिडीज, ह्युंदाई, ऑडी, रेनॉल्ट आणि एमजी मोटर्स यांसारख्या देशातील बहुतेक मोठ्या कार उत्पादकांनी त्यांच्या कारच्या किंमती वाढवण्याची घोषणा केली आहे. वाहनांचे नवे दर 1 जानेवारी 2023 पासून लागू होतील.
योजनेचा व्याजदर वाढणार
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पोस्ट ऑफिस योजनेचा व्याजदर वाढणार आहे. सरकारनं पोस्ट ऑफिस योजनांच्या व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. एनएससी, मासिक उत्पन्न योजना, ज्येष्ठ नागरिक बचत योजनांचे व्याजदर वाढवले आहेत. ही वाढ 20 ते 110 बेसिस पॉइंट्सवर करण्यात आली.
जीएसटी इलेक्ट्रॉनिक बिल आवश्यक
आज 1 जानेवारी 2023 पासून जीएसटी नियमांत मोठा बदल होणार आहे. पाच कोटींपेक्षा जास्त व्यवसायासाठी ई-इनव्हॉइसिंग म्हणजेच इलेक्ट्रॉनिक बिल अनिवार्य असणार आहे. यापूर्वी ही मर्यादा 20 कोटी रुपये होती, ती आता 5 कोटी रुपये करण्यात आली.
बँक लॉकर नियम
आजपासून बँक लॉकरच्या नियमांमध्येही बदल होणार आहे. नवीन नियमानंतर लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तू हरवल्यास बँक त्याची जबाबदारी घेईल. लॉकरबद्दल कोणताही निर्णय घेण्यापूर्वी बँकेला ग्राहकांना माहिती द्यावी लागेल. ग्राहकांना बँकेच्या नव्या नियमावलीवर स्वाक्षरी करणे महत्त्वाचं आहे.
विमा प्रीमियम महागणार
2023 या नवीन वर्षामध्ये विमा प्रीमियम महागण्याची शक्यता आहे. आयआरडीएआय वाहनांचा वापर आणि देखभाल यावर आधारित विमा प्रीमियमसाठी नवीन वर्षात नवीन नियम लागू होण्याची शक्यता आहे. नवीन वर्षात लोकांना महागड्या विमा हप्त्यांचा झटका बसण्याची शक्यता आहे.