Nigeria News : आफ्रिकेतील देश नायजेरियातून एक धक्कादायक (Nigeria News) बातमी समोर आली आहे. नायजेरियातील जिगावा या राज्यात मंगळवारी इंधनाने भरलेला टँकर अचानक पलटला. टँकरचालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे. टँकर पलटी झाल्याने यातील इंधन सगळीकडे पसरले. नंतर येथे मोठा स्फोटही झाला. रॉयटर्सने दिलेल्या रिपोर्टनुसार या दुर्घटनेत तब्बल 147 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. दुर्घटनेनंतर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. यानंतर राज्य आपत्कालीन सेवा आणि पोलिसांनी या घटनेची माहिती दिली.
भीषण अपघात! तेल टँकर अन् ट्रकची धडक, अपघातात 48 जण ठार; तर सुमारे 50 गुरे जिवंत जळाली
नायजेरियात याआधीही असाच भीषण अपघात घडला. तेल टँकर आणि ट्रकची धडक होऊन 48 लोकांचा मृत्यू झाला होता. 50 जनावरेही होरपळून मृत्यूमुखी पडली होती. यानंतर आता पु्न्हा भीषण अपघात घडला आहे. इंधनाचा टँकर उलटून मोठा अपघात मंगळवारी घडला. या अपघातात 147 लोकांचा मृत्यू झाला अशी माहिती जिगावा राज्य आपत्कालीन सेवा प्रमुख हारुना मैरिगा यांनी सांगितले.
रिपोर्टनुसार स्थानिक पोलीस प्रवक्ते शिसू एडम यांनी सांगितले की टँकर कानो या शहरातून योबे राज्याकडे निघाला होता. राजधानी अबुजापासून जवळपास 530 किलोमीटर उत्तरेतील तौरा भागातील माजिया शहराजवळ असताना टँकरचे नियंत्रण सुटले. यामुळे टँकर उलटला आणि इंधन सगळीकडे पसरले. पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड उडाली. याच दरम्यान मोठा स्फोट झाला. यामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला. काही लोक जखमी झाले. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
🇳🇬NIGERIA: At least 94 people died in northern Nigeria when a tanker exploded as locals gathered to retrieve fuel in Majiya, Jigawa state. The blast occurred after the driver lost control and spilled fuel into a ditch. Over 50 are seriously injured, and the death toll may rise. pic.twitter.com/Rf5ygQmVuk
— Evoclique (@Evoclique_) October 16, 2024
नायजेरियामध्ये माल वाहतूक करण्यासाठी सक्षम रेल्वे यंत्रणा नाही, त्यामुळे आफ्रिकेच्या सर्वाधिक लोकसंख्याच्या देशात जीवघेणे ट्रक अपघात सतत होत असतात. नायजेरियाच्या फेडरल रोड सेफ्टी कॉर्प्सच्या मते, 2020 मध्ये पेट्रोल टँकरचे 1531 अपघात झाले, ज्यामध्ये 535 लोकांचा मृत्यू आणि 1142 लोक जखमी झाले होते. रस्ते अपघातांची संख्या कमी करण्यासाठी येथे ठोस उपाययोजना होत नाहीत. त्यामुळे अपघातांची संख्या वाढत चालली आहे.