Pakistan-India peace : भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्ष गेल्या दशकात टोकाला पोहोचला आहे. दोन्ही देशातील चर्चा जवळपास बंद झाली आहे. आता पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी नरमाईची भूमिका घेत भारताला चर्चेची ऑफर दिली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ म्हणाले की, युद्ध हा पर्याय नाही आणि आपण भारताशी चर्चेसाठी तयार आहोत.
शरीफ म्हणाले, ‘गेल्या 75 वर्षांत आम्ही तीन युद्धे लढली आहेत. त्यातून केवळ गरिबी, बेरोजगारी आणि संसाधनांचे नुकसान झाले आहे. युद्ध आता पर्याय नाही. जर शेजारी (भारत) गंभीर असेल तर पाकिस्तान चर्चेसाठी तयार आहे, असे पंतप्रधान शाहबाज शरीफ म्हणाले.
यावेळी शाहबाज शरीफ यांनी 1965 (काश्मीर युद्ध), 1971 युद्ध (बांगलादेशचे विभाजन), 1999 (कारगिल युद्ध) या युद्धांचा उल्लेख केला. या तिन्ही युध्दामध्ये पाकिस्तानला पराभवाला सामोरे जावे लागले होते. पाकिस्तान एकीकडे शांततेच्या गप्पा मारत असला तरी आपल्या अण्वस्त्रांची संख्या वाढवण्यात मात्र मागे नाही. गेल्या वर्षभरातच त्यांनी आपल्याकडे 5 अण्वस्त्रे जमा केली आहेत.
भारतापेक्षा अधिक अण्वस्त्रे
स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (SIPRI) च्या जून 2023 च्या अहवालानुसार, चीनने गेल्या एका वर्षात 60 अण्वस्त्रे वाढवली आहेत. रशियाने 12, पाकिस्तानने 5, उत्तर कोरियाने 5 आणि भारताने 4 शस्त्रे वाढवली आहेत. अहवालानुसार, अण्वस्त्रांच्या बाबतीत पाकिस्तान भारतापेक्षा पुढे आहे. त्यांच्याजवळ 170 अण्वस्त्रे आहेत. तर भारताकडे 164 शस्त्रे आहेत.
बिहारमध्ये पुन्हा जातनिहाय जनगणना होणार, पाटणा हायकोर्टाच्या निर्णयाचा बिहार सरकारला दिलासा
शांततापूर्ण चर्चेची तयारी दर्शवली
एकीकडे पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी युद्ध न करण्याचे आवाहन केले तर दुसरीकडे त्यांनी भारतावर आरोपही केले. ते म्हणाले की, शेजारी देशाला (भारत) समजून घेणे आवश्यक आहे की असामान्य गोष्टी दूर केल्याशिवाय परिस्थिती सामान्य होऊ शकत नाही. काही गंभीर प्रश्न शांततेने आणि अर्थपूर्ण चर्चेने सोडवावे लागतील.
गृहयुद्धाने त्रासले
शांततेचा पुरस्कार पाकिस्तानने अशा वेळी केला आहे जेव्हा ते स्वतः गृहयुद्धाचा सामना करत आहे. गेल्या आठवड्यात खैबर पख्तुनख्वा प्रांतात एका रॅलीदरम्यान आत्मघाती हल्ला झाला होता, ज्यामध्ये 54 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. 2023 च्या पहिल्या सात महिन्यांत 18 आत्मघातकी हल्ले झाले आहेत ज्यात 200 जणांना जीव गमवावा लागला आहे, तर या हल्ल्यांमध्ये 450 हून अधिक जण जखमी झाले आहेत.
Kangana Ranaut: ‘ओपनहाइमर’चं कंगनाकडून तोंडभरुन कौतुक; व्हिडीओ शेअर करत म्हणाली…
एवढेच नाही तर पाकिस्तानमध्ये महागाईही शिगेला पोहोचली आहे. यासोबतच स्वतंत्र देश निर्माण करण्याची मागणीही अनेक भागांतून जोर धरू लागली आहे. असे असूनही भारताविरुद्ध दहशतवाद्यांना तयार करण्याचे त्यांचे नापाक कृत्य सुरूच आहे. त्यांच्याकडून भारतात घुसखोरी, शस्त्रे आणि ड्रग्ज पाठवणे सुरूच आहे. पाकिस्तानच्या या वृत्तीमुळे भारताने स्पष्ट केले होते की, जोपर्यंत पाकिस्तान जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद थांबवत नाही तोपर्यंत संबंध सामान्य होऊ शकत नाहीत.