Pakistan News : भारताच्या शेजारील देश पाकिस्तानात सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या शिफारसीनंतर देशाचे राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी बुधवारी मध्यरात्री पाकिस्तानची संसद बरखास्त केली. संसदेचे कनिष्ठ सभागृह असलेल्या नॅशनल असेंब्लीचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या तीन दिवस आधीच हा निर्णय अंमलात आणला गेला. संसद बरखास्त केल्यानंतर पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सरकारचा कार्यकाळही आता संपुष्टात आला आहे.
नॅशनल अॅसेंब्ली संविधानाच्या कलम 58 नुसार भंग करण्यात आली आहे. संसदेचा पाच वर्षांचा कार्यकाळ अधिकृतरित्या 12 ऑगस्ट रोजी संपणार होता, असे अधिसूचनेत म्हटले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनीच पत्र लिहून संसद भंग करण्याची शिफारस राष्ट्रपतींकडे केली होती. या आर्टिकलनुसार पंतप्रधानांच्या शिफारसीनंतर जर 48 तासांत संसद भंग केली नाही तर 48 तासांनंतर संसद आपोआप भंग होते.
हे होणार पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान, भारतात होते उपउच्चायुक्त
पंतप्रधान शरीफ यांनी मंगळवारी जनरल हेडक्वार्टरला (जीएचक्यू) निरोप दिला होता. 10 एप्रिल 2022 रोजी पाकिस्तानमध्ये उद्भवलेल्या राजकीय संकटादरम्यान तत्कालीन पंतप्रधान इम्रान खान यांच्या विरोधात अविश्वास प्रस्तावानंतर विरोधी पक्षांच्यावतीने शाहबाज शरीफ यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पाठिंबा देण्यात आला होता. दुसऱ्या दिवशी म्हणजे 11 एप्रिल 2022 रोजी त्यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती.
पाकिस्तानच्या संविधानानुसार संसद भंग झाल्यानंतर पंतप्रधान आणि नॅशनल अॅसेंब्लीच्या विरोधी पक्षनेत्याने तीन दिवसांत हंगामी पंतप्रधानांचं नाव राष्ट्रपतींकडे द्यायचे असते. त्यानुसार पंतप्रधान शरीफ आणि विरोधी पक्षनेत्याकडे पंतप्रधानांचं नाव सुचविण्यासाठी तीन दिवस शिल्लक आहेत. जर काळजीवाहू पंतप्रधानांच्या नावावर सहमती झाली नाही तर अॅसेंब्ली स्पीकरद्वारे तयार करण्यात आलेल्या समितीकडे हे प्रकरण जाते. या समितीला मात्र तीन दिवसांत काळजीवाहू पंतप्रधानपदासाठी नाव सुचवणे बंधनकाकर असते.
जर या समितीने नाव सुचवले नाही तर या पदासाठी दावेदार असणाऱ्या उमेदवारांची नावे निवडणूक आयोगाकडे पाठविली जातात. निवडणूक आयोग त्यावर दोन दिवसांत निर्णय घेतो.