Download App

पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या 199 भारतीयांची होणार सुटका

Pakistan To Release 199 Indian Fishermen : नकळतपणे अरबी समुद्राची हद्द ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीत गेलेल्या 199 भारतीयांची लवकरच सुटका होणार आहे. दरम्यान 199 मच्छिमारांसह आणखी एका भारतीय नागरिकाचा या काळात मृत्यू झाला असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे. या मच्छिमारांना लाहोरला पाठवले जाईल आणि त्यानंतर वाघा सीमेवर भारतीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात संबंधितांना दिले जाईल. हे मच्छीमार सध्या येथील लांधी कारागृहात बंद आहेत. दरम्यान या भारतीयांची सुटका होणार असल्याने भारतीय मच्छिमार कुटूंबांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला आहे. त्यांच्या कुटुंबियांचे डोळे पाकिस्तानी तुरुंगातून भारतात परतणाऱ्या आपल्या कुटूंब सदस्याकडे लागले आहेत.

सिंधमधील तुरुंग आणि सुधार विभागातील उच्च पोलीस अधिकारी काझी नजीर यांनी सांगितले की, त्यांना संबंधित सरकारी मंत्रालयांनी शुक्रवारी १९९ मच्छिमारांना सोडण्यास आणि त्यांच्या मायदेशी परत जाण्याची तयारी करण्यास सांगितले आहे. तसेच ते पुढे बोलताना म्हणाले की, भारतीय नागरिक असलेल्या झुल्फिकारचे जारपणामुळे कराची येथील रुग्णालयात शनिवारी निधन झाले. मच्छिमारांसोबत झुल्फिकारलाही सोडण्यात येणार होते. मार त्याच्या पूर्वी त्याचे निधन झाले आहे.

मयत कैद्याबाबत अधिक माहिती देताना तुरुंगातील अधिकाऱ्याने सांगितले की, संबंधित कैद्याला खूप ताप आणि छातीत अस्वस्थता जाणवू लागली होती. याबाबतची तक्रार देखील करण्यात आली होती आणि गेल्या आठवड्यात त्याची प्रकृती अधिकच बिघडली होती. त्याला रुग्णालयात पाठवण्यात आले, तेथे फुफ्फुसाच्या संसर्गामुळे त्याचा मृत्यू झाला.

‘पाकिस्तान इंडिया पीपल्स फोरम फॉर पीस अँड डेमोक्रसी’नुसार, 631 भारतीय मच्छिमार आणि एक अन्य कैदी सध्या कराचीच्या लांधी आणि मालीर तुरुंगात त्यांची तुरुंगवासाची मुदत पूर्ण करूनही बंद आहेत. कराचीतील फोरमसोबत काम करणाऱ्या आदिल शेख यांनी सांगितले की, या सर्व भारतीय मच्छिमारांना पाकिस्तान आणि भारत यांच्यातील सागरी प्रादेशिक सीमांकन कराराचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली अटक केल्यानंतर त्यांना पाकिस्तानच्या तुरुंगात ठेवण्यात आले होते. दरम्यान कराची तुरुंगात एकूण 654 भारतीय मच्छिमार कैद आहेत, तर दुसरीकडे 83 पाकिस्तानी मच्छीमार हे भारतीय तुरुंगात जेरबंद आहेत. 654 भारतीय मच्छिमारांपैकी तब्बल 631 जणांनी शिक्षा पूर्ण केली असून ते सुटकेच्या प्रतीक्षेत आहेत.

Tags

follow us