Download App

नेपाळमध्ये प्रवाशी विमान कोसळलं; 32 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : नेपाळमधील पोखरा येथे प्रवाशी विमान कोसळल्याची घटना घडली आहे. धावपट्टीवर पोहोचण्यापूर्वीच विमान कोसळले. या अपघातात आतापर्यंत 32 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. विमानात 72 जण असल्याची माहिती समोर येत असून मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो.

नेपाळमधील पोखरा येथे प्रवासी विमान कोसळले असून त्यात एकूण 68 प्रवासी आणि 4 क्रू मेंबर होते. नेपाळ आर्मी, सशस्त्र पोलीस, नेपाळ पोलीस तसेच स्थानिक नागरिक यांच्याकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. दरम्यान आतापर्यंत 32 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. दुर्घटनाग्रस्त प्रवासी विमान राजधानी काठमांडूहून पोखराला जात होते.

अधिक माहिती अशी, यती एअरलाइन्सच्या एटीआर 72 विमानाने रविवारी सकाळी काठमांडूहून पोखरासाठी उड्डाण केले होते, परंतु कास्की जिल्ह्यातील पोखरामध्ये विमान एका डोंगराला आदळलं. डोंगराला धडकल्यानंतर विमान नदीत कोसळलं. त्यानंतर विमानातून धूर येऊ लागला.

दुर्घटनास्थळापासून बऱ्याच अंतरावरून हा धूर पाहायला मिळाला. अपघाताची माहिती मिळताच विमान कंपनी, विमानतळ प्राधिकरण, सुरक्षा दल, आपत्ती निवारण विभागानं मदतकार्य सुरू केलं. या कारणास्तव विमानतळ काही काळासाठी बंद करण्यात आले होते. अपघाताच्या वेळी यती एअरलाइन्सच्या विमानात 68 प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स होते.

विमानात या देशांचे नागरिक होते
नेपाळमधील पोखरा विमानतळावर कोसळलेल्या विमानात 53 नेपाळी नागरिक, 5 भारतीय, 4 रशियन, एक आयरिश, 2 कोरियन, एक अर्जेंटाइन आणि एक फ्रेंच नागरिक होते.

Tags

follow us