पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या तीन देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी रविवारी (21 मे) पापुआ न्यू गिनी येथे पोहोचले. FIPIC परिषदेत सहभागी होण्यासाठी PM मोदी पापुआ न्यू गिनी येथे पोहोचले आहेत. जेथे त्यांचे पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारापे यांनी स्वागत केले. यादरम्यान पापुआ न्यू गिनीच्या पंतप्रधानांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाया पडले.
पापुआ न्यू गिनी येथील मोरेस्बी (जॅक्सन) आंतरराष्ट्रीय विमानतळावर पंतप्रधान मोदींचे पारंपारिक स्वागत करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने अनिवासी भारतीय उपस्थित होते. पंतप्रधानांना गार्ड ऑफ ऑनरही देण्यात आला. पंतप्रधान 22 मे रोजी पापुआ न्यू गिनी येथे भारत-पॅसिफिक द्वीपसमूह सहकार्यासाठी (FIPIC) तिसरे फोरम त्यांचे समकक्ष जेम्स मारापे यांच्यासमवेत आयोजित करतील.
पंतप्रधान जपानहून पापुआ न्यू गिनी येथे पोहोचले
तीन देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात मोदी पापुआ न्यू गिनी येथे पोहोचले आहेत. कोणत्याही भारतीय पंतप्रधानांची पापुआ न्यू गिनीला ही पहिलीच भेट आहे. पंतप्रधानांचे जपानहून येथे आगमन झाले जेथे त्यांनी G-7 शिखर परिषदेत भाग घेतला आणि अनेक जागतिक नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेतल्या. FIPIC ची स्थापना 2014 मध्ये पंतप्रधान मोदींच्या फिजी दौऱ्यादरम्यान झाली.
“PM मोदी यांनी नाही तर…” नवीन संसद भवनाच्या उद्घटनावरुन राहुल गांधींची मोठी मागणी
यामध्ये 14 देशांचे नेते सहभागी होणार आहेत
FIPIC परिषदेत 14 देशांचे नेते सहभागी होणार आहेत. कनेक्टिव्हिटी आणि इतर समस्यांमुळे हे सर्व क्वचितच एकत्र आढळतात. PIC मध्ये कूक आयलंड, फिजी, किरिबाटी, मार्शल बेटे, मायक्रोनेशिया, नाउरू, नियू, पलाऊ, पापुआ न्यू गिनी, सामोआ, सोलोमन बेटे, टोंगा, तुवालू आणि वानुआतु यांचा समावेश आहे. पंतप्रधान मोदी मरापे यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील आणि पापुआ न्यू गिनीचे गव्हर्नर जनरल बॉब डेड यांचीही भेट घेतील.