Rahul Gandhi On America Visit : काँग्रेस नेते राहुल गांधी मंगळवारी (३० मे) अमेरिकेत दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी सॅन फ्रान्सिस्कोमध्ये भारतीय वंशाच्या लोकांची भेट घेतली आणि त्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी त्यांच्या खास शैलीत भारत जोडो यात्रेचा संदर्भ देत देशाच्या राजकारणावर भाष्य करत भाजप आणि आरएसएसवर जोरदार हल्ला चढवला. तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोलादेखील लगावला. त्यांच्या या विधानावरून आता देशातील वातावरण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मोदींवर बाण सोडताना ते म्हणाले की, जग इतके मोठे आहे की, कोणतीही व्यक्ती हा दावा करु शकत नाही की, त्याला सर्व काही माहिती आहे. पण काहींना हा आजार आहे. भारतात काही लोक असे आहेत की, त्यांना सर्व काही माहिती आहे, असे त्यांना वाटते. जगभरात काय घडामोड सुरु आहे, याची वित्तं बातमी ते देवाला सांगण्याची हिम्मत करु शकतात असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यापैकी एक आहेत असा बाण राहुल गांधींनी सोडला.मोदीजींना देवाजवळ बसवले तर ते ब्रह्मांड कसे चालते हेदेखील देवाला समजावून सांगू लागतील.
भारत जोडोवर केले भाष्य
यावेळी राहुल गांधींनी काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवरही भाष्य केले. ते म्हणाले की, ही यात्रा सुरू झाली तेव्हा ५-६ दिवसांनी मला समजले की, ही यात्रा सोपी असणार नाही. हजारो किलोमीटरचा पायी प्रवास करणं खूप अवघड वाटत होतं, पण माझ्याकडे पर्याय नव्हता. मी, काँग्रेसचे कार्यकर्ते आणि समर्थक रोज २५ किलोमीटरचा प्रवास करत होतो. त्या प्रवासात केवळ काँग्रेसच नाही, तर संपूर्ण भारत पावलापावलाने पुढे जात होते. काँग्रेसची चांगली गोष्ट म्हणजे आम्ही सर्वांसोबत आहोत. कोणी येऊन काही बोलू इच्छित असेल तर इथे त्याचे म्हणणे ऐकले जाते.