Download App

Russia : रशियाचा राष्ट्राध्यक्ष कोण? तीन दिवस चालणार मतदान; पुतिन यांचं पारडं जड

Russia President Election : भारतात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. मात्र त्याआधी मित्रदेश रशियात राष्ट्राध्यक्षपदाच्या (Russia President Election) निवडीसाठी मतदान सुरू झाले आहे. शुक्रवारपासून मतदानाला सुरुवात झाली असून रविवारपर्यंत मतदान सुरू राहणार आहे. निवडणुका घेतल्या जात असल्या तरी या फक्त औपचारिकताच आहे. कारण सध्याचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांना तगडा विरोधकच राहिलेला नाही. त्यामुळे या निवडणुकीत त्यांचाच विजय निश्चित मानला जात आहे.

रशियाची राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक यंदा महत्वाची ठरत आहे. यामागे काही कारणे आहेत. ही निवडणूक अशा वेळी होत आहे ज्यावेळी रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. पुतिन यांच्यासमोर कुणीच विरोधक नाही. कट्टर विरोधक अॅलेक्सी नवलनी यांचा तुरुंगातच मृत्यू झाला. देशात पहिल्यांदाच तीन दिवस मतदान सुरू राहणार आहे.

या निवडणुकीत पुतिन यांचा विजय निश्चित मानला जात आहे. रशियाच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीची प्रक्रिया खूप वेगळी आहे. पॉप्युलर वोट पद्धतीने राष्ट्राध्यक्ष निवड केली जाते. म्हणजेच ज्या उमेदवाराला 50 टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळतात तोच राष्ट्राध्यक्ष निवडला जातो. जर उमेदवारांची संख्या जास्त असेल आणि कुणालाच 50 टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळाली नसतील तर अशा परिस्थितीत तीन आठवड्यानंतर पुन्हा निवडणूक घेतली जाते. यामध्ये दोनच उमेदवार आघाडीवर असतात. या दोघांतून एकाची राष्ट्राध्यक्षपदासाठी निवड केली जाते.

Vladimir Putin : पुतिन एकदम फिट अँड फाईन; हार्टअटॅकच्या केवळ अफवा, क्रेमिनिलचा दावा

पुतिन चार वेळेस राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडले गेले आहेत. प्रत्येक निवडणुकीत त्यांची मते वाढली आहेत. सन 2000 मध्ये पुतिन पहिल्यांदा राष्ट्राध्यक्षपदी निवडले गेले होते. त्यावेळी त्यांना 54 टक्के मते मिळाली होती. त्यानंतर 2004 मध्ये 72 टक्के आणि 2012 मध्ये 65 टक्के मत मिळाले होते. 2018 मधील निवडणुकीत पुतिन यांना 77 टक्के मते मिळाली होती.

न्यूज संस्थेच्या माहितीनुसार पुतिन यांची रशियात एक कठोर नेता म्हणून ओळख आहे. त्यांच्या लोकप्रियतेमागे हे एक मोठे कारण आहे. युक्रेनविरुद्धच्या युद्धात पुतिन यांच्यावर युद्ध गुन्ह्याचे आरोप केले जात असले तरी देशातील नागरिकांचा एक मोठा वर्ग आजही त्यांच्या पाठिशी उभा आहे.

व्लादिमीर पुतिन हेच अमेरिका आणि युरोप यांसारख्या पश्चिमी देशांना उत्तर देऊ शकतात असे रशियन नागरिकांना वाटते. फेब्रुवारी महिन्यात एक सर्वे झाला होता त्यात 75 टक्के रशियन लोकांनी पुतिन यांनाच मतदान करणार असल्याचे म्हटले होते. पुतिन यांचा सामना करेल असा एकही नेता सध्या रशियात नाही. पुतिन यांना विरोध करणाऱ्या नेत्यांचा एकतर मृत्यू झाला आहे किंवा हे नेते अज्ञातवासात तरी गेले आहेत.

Vladimir Putin : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याकडून ‘मेक इन इंडिया’चे कौतुक

follow us