Russia Ukraine War : रशिया आणि यु्क्रेन यांच्यात मागील दोन वर्षांपासून युद्ध (Russia Ukraine War) सुरू आहे. काल या युद्धाचा मोठा भडका उडाला. मागील काही दिवसांपासून रशियाने युक्रेनवर मोठा हल्ला केला नव्हता. मात्र, काल रशियाने युक्रेनवर मोठा हल्ला केला. युक्रेनवर तब्बल 122 क्षेपणास्त्र डागण्यात आली. तसेच 36 ड्रोन हल्ले केले. या हल्ल्यात युक्रेनमधील 27 नागरिकांचा बळी गेला अनेक लोक जखमी झाले. या हल्ल्यानंतर खवळलेल्या युक्रेननेही जोरदार पलटवार केल्याचे वृत्त आहे. युक्रेनच्या सैन्याने शनिवारी रशियन शहर बेल्गोरोडवर तुफान बॉम्बफेक केली. या हल्ल्यात दोन मुलांसह 20 जण ठार झाले. तर 111 लोक जखमी झाले. शहरावर बॉम्बने हल्ल झाल्याचे रशियन अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
युक्रेनच्या या हल्ल्याने रशियाही गडबडून गेला आहे. या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर देणार असल्याचे रशियन अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. त्यामुळे युद्ध पुन्हा भडकणार असल्याचेच दिसून येत आहे. रशियाच्या संरक्षण विभागाने एका निवेदनात म्हटले आहे की युक्रेन सरकार पराभवावरून लक्ष हटविण्यासाठी अशा कारवाया करत आहे आणि आम्हाला प्रत्युत्तर देण्यास भाग पाडत आहे. युक्रेनच्या या हल्ल्यानंतर रशियाने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक बोलावण्याची सूचना केली आहे.
रशियाच्या हल्ल्यातील मृतांची संख्या वाढली
शुक्रवारी रशियाने अचानकपणे युक्रेनवर मोठा हल्ला केला होता. 122 क्षेपणास्त्र आणि 36 ड्रोनहल्ले करण्यात आले. या हल्ल्यात 27 युक्रेनियन नागरिकांचा मृत्यू झाल्याचे आधी सांगण्यात येत होते. मात्र ही संख्या वाढली आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी सांगितले की रशियाच्या या हल्ल्यात 39 नागरिकांचा मृत्यू झाला तर 159 नागरिक जखमी झाले आहेत. या हल्ल्यांमुळे 120 शहरे आणि काही गावे प्रभावित झाली असून येथे मोठे नुकसान झाले आहे.
रशिया आणि युक्रेनच्या सीमेवर हल्ले सुरुच आहेत. मात्र आतापर्यंतचा हा सर्वात मोठा हल्ला असल्याचे सांगण्यात आले. यानंतर काल युक्रेनने प्रत्युत्तराची कारवाई करत रशियाच्या शहरावर बॉम्बफेक केली. या हल्ल्यात 20 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र ही संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. यानंतर आता रशिया काय कारवाई करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.