मुंबई : आयएनएस वागीर (INS Vagir) ही पाणबुडी आता भारतीय नौदलाच्या (indian navy) ताफ्यात तैनात करण्यात येणार असल्याची माहिती समोर आलीय. येत्या 23 जानेवारीला आयएनएस वागीर (INS Vagir) ही पाणबुडी ताफ्यात तैनात करण्यात येणार आहे.
आयएनएस वागीर ही कलवरी श्रेणीतील सर्वात कमी कालावधीत तयार झालेली आणि चाचणी दरम्यान नौदलातील महिला अधिकाऱ्यांना घेऊन पाण्याखाली प्रवास केलेली एकमेव पाणबुडी आहे. वागीर या पाणबुडीचे जलावतरण 12 नोव्हेंबर 2020 रोजी झाले. या पाणबुडीच्या सागरी चाचण्या 1 फेब्रुवारी 2022 पासून सुरू झाल्या.
ही पाणबुडी स्कॉर्पीन दर्जाची आयएनएस वागीर असून तिला भारतीय नौदलाचा ‘सायलेंट किलर'(silent killer) म्हणून संबोधण्यात येत आहे. डिझेल इलेक्ट्रिक या दोन्ही माध्यमातून कार्यान्वित असणार आहे.
ही पाणबुडी शत्रूला चकवा देणे आणि हल्ला करण्यात सक्षम आहे. शत्रूला कल्पनाही न येता ही पाणबुडी त्यावर हल्ला करणार आहे. भारतीय नौदलाचे प्रमुख एडमिरल आर. हरी कुमार कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असणार आहेत. ही पाणबुडी माझगाव डॉक शिपबिल्डर लिमिटेड आणि फ्रान्सच्या नौदलाच्या संयुक्त कामगिरीने तयार करण्यात आली.
पी 75 या कार्यक्रमातील ही पाचवी पाणबुडी असून या वर्षाच्या अखेरीस नौदलाला या कार्यक्रमातील सहावी आणि शेवटची पाणबुडी मिळणार आहे. फ्रान्सच्या स्कॉर्पिन तंत्रज्ञानाचा या पाणबुडीच्या विकासासाठी वापर करण्यात आला आहे.
मुंबईतील माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड या स्वदेशी कंपनीने या पाणबुडीची निर्मिती केली आहे. ही नौदलाच्या ताफ्यातील कलावरी श्रेणीतील पाचवी पाणबुडी आहे. भारतीय नौदलाच्या ‘प्रोजेक्ट 75’ प्रकल्पाच्या अंतर्गत आतापर्यंत कलावरी श्रेणीतील चार पाणबुड्या याआधीच नौदलात सामील झाल्या आहेत.
भारतीय नौदलाला 23 जानेवारीला INS वागीर अटॅक पाणबुडी मिळणार आहे. कलावरी श्रेणीच्या पहिल्या तुकडीतील सहा पाणबुड्यांपैकी ही एक पाणबुडी आहे.