निसर्गाच्या रौद्ररूपाचा फटका, नेपाळच्या डोंगराळ भागात सहा भारतीय पर्यटक बेपत्ता, हेलिकॉप्टरद्वारे शोध घेण्याची तयारी!

नेपाळमध्ये ट्रेकिंगसाठी गेलेला हा पर्यटकांचा समूह जोरदार हिमवृष्टी आणि प्रतिकूल हवामानामुळे अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Untitled Design   2026 11 01T125146.054

Untitled Design 2026 11 01T125146.054

Six Indian tourists go missing in the mountainous region of Nepal : नेपाळमधील हिमालयाच्या दुर्गम पर्वतीय भागात ट्रेकिंगसाठी गेलेले सहा भारतीय पर्यटक बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये दोन महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे. नेपाळमधील प्रसिद्ध शे-फोक्सुंडो सरोवर परिसरात ट्रेकिंगसाठी गेलेला हा पर्यटकांचा समूह जोरदार हिमवृष्टी आणि प्रतिकूल हवामानामुळे अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पर्यटकांशी संपर्क होत नसल्याने त्यांचा शोध घेण्यासाठी स्थानिक प्रशासन, पोलीस आणि नेपाळ लष्कराने प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, दुर्गम भौगोलिक परिस्थिती, दाट बर्फ आणि मोबाईल नेटवर्कचा अभाव यामुळे बचावकार्यात मोठे अडथळे निर्माण होत आहेत.

एएनआयमी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, हे सहा भारतीय पर्यटक डोल्पो बुद्ध गावपालिकेच्या वॉर्ड क्रमांक 4 आणि 8 परिसरातून शे-फोक्सुंडो सरोवराच्या दिशेने प्रवास करत होते. शे-फोक्सुंडो ग्रामपंचायतीकडे नोंदणी पास घेताना त्यांचा शेवटचा संपर्क झाला होता. त्यानंतर ते नेमके कुठे गेले आणि सध्या कोणत्या ठिकाणी आहेत, याबाबत कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या अर्णब चक्रीवादळाच्या प्रभावामुळे हिमालयीन भागातील हवामानात मोठे बदल झाले असून, नेपाळच्या डोल्पो परिसरात जोरदार हिमवृष्टी झाल्याचे वृत्त आहे. या बर्फवृष्टीमुळे उंच पर्वतीय मार्गांवर मोठ्या प्रमाणात बर्फ साचला आहे. त्यामुळे डोंगराळ भागातून प्रवास करणे धोकादायक बनले आहे.

धो परिसरातून फोक्सुंडो सरोवराच्या दिशेने परतत असताना पर्यटकांना खराब हवामानाचा सामना करावा लागल्याची माहिती आहे. स्थानिक ग्रामस्थ्यांनी हवामानातील बदल लक्षात घेऊन पर्यटकांना पुढील प्रवास टाळण्याचा आणि सुरक्षित ठिकाणी थांबण्याचा इशारा दिला होता. मात्र, हा इशारा मिळून देखील पर्यटकांनी प्रवास सुरू ठेवल्याचे डोल्पाच्या जिल्हाधिकारी ज्यून हमाल यांनी सांगितले. त्यामुळे परतीच्या प्रवासादरम्यान हे पर्यटक उंच पर्वतीय मार्गांवरील बर्फात अडकले असावेत, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

ऐन दिवाळीत महाराष्ट्रावर वीज संकटाचे सावट, महानिर्मितीकडे अवघे चार दिवस पुरेल एवढाचं कोळशाचा साठा

या शोधमोहिमेत सर्वात मोठी अडचण मोबाईल नेटवर्कची निर्माण झाली आहे. नुमला आणि बगला पास या उंच पर्वतीय खिंडीच्या परिसरात मोबाईल नेटवर्क पूर्णपणे बंद पडले आहे. त्यामुळे बेपत्ता पर्यटकांशी संपर्क साधने अशक्य झाले आहे. पर्यटकांनी शेवटचा संपर्क कुठून साधला, त्यानंतर त्यांनी कोणता मार्ग निवडला आणि ते सध्या कोणत्या ठिकाणी अडकले असावेत, याचा अंदाज घेणे देखील प्रशासनासाठी कठीण ठरत आहे. शे-फोक्सुंडो गावपालिकेचे सरपंच धावा समदुक गुरुंग यांनी देखील या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे. संबंधित खिंडीच्या परिसरात मोबाईल नेटवर्क उपलब्ध नसल्याने पर्यटकांचे नेमके ठिकाण शोधण्यात अडचणी येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सहा भारतीय पर्यटक बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने शोध आणि बचावकार्य सुरू केले आहे. डोल्पाचे पोलीस उपअधीक्षक अनिल राज गिरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ताज्या माहितीनुसार हे सहाही पर्यटक अद्याप संपर्काबाहेर आहेत. बचावकार्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्याबाबत संबंधित संस्थेकडे विनंती करण्यात आली आहे. याशिवाय, बेपत्ता पर्यटकांचा शोध घेण्यासाठी आणि बचावकार्यात मदत करण्यासाठी नेपाळ लष्कराचे पथकही तैनात करण्यात आले आहे. मात्र, परिसरात सुरू असलेली हिमवृष्टी, उंच पर्वतरांगा, बर्फाने झाकलेले मार्ग आणि प्रतिकूल हवामान यामुळे बचाव पथकांना मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. हेलिकॉप्टरच्या माध्यमातून शोधमोहीम राबविण्याच्या प्रयत्नांनाही हवामानाची साथ मिळणे आवश्यक आहे.

गुटखा तस्करीचे भिवंडीत मोठे रॅकेट? 57 लाखांचा मुद्देमाल जप्त, उत्तर प्रदेशातील 39 वर्षीय आरोपीला अटक!

दरम्यान, जिल्हा प्रशासन कार्यालयाच्या माहितीनुसार, अप्पर डोल्पा या दुर्गम पर्यटन क्षेत्रात एकूण 244 पर्यटक पोहोचले आहेत. यामध्ये 149 नेपाळी नागरिक, सार्क देशांतील 44 पर्यटक आणि इतर परदेशी देशांतील 51 पर्यटकांचा समावेश आहे. हिमालयीन भागात हवामान झपाट्याने बदलत असल्याने पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने पर्यटकांना जोखमीच्या पर्वतीय मार्गांवर जाणे टाळण्याचे आणि सुरक्षित ठिकाणी थांबण्याचे आवाहन केले आहे.

सध्या सर्वांचे लक्ष बेपत्ता झालेल्या सहाही भारतीय पर्यटकांच्या शोधमोहिमेकडे लागले आहे. प्रतिकूल हवामान आणि दुर्गम भौगोलिक परिस्थितीवर मात करून बचाव पथकांना पर्यटकांपर्यंत पोहोचण्यात यश येते का, हे महत्त्वाचे ठरणार आहे. या सहाही पर्यटकांची सुखरूप सुटका व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version