डीएनए, युनिक आयडी आणि जिओ-टॅगच्या मदतीने मृतांची ओळख पटवणार; नेपाळची विशेष तयारी

Nepal Flood-बचाव पथकांना सापडलेल्या काही मृतदेहांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. त्यांची ओळख पटवणे कठीण झाले आहे.

  • Ashok Parude
  • Written By: Published:
Nepal Flood

DNA, unique IDs and geo-tags, How Nepal plans to identify flood victims after burial : नेपाळमध्ये आलेल्या पुरामुळे (Nepal Flood) आतापर्यंत 680 जणांचा मृत्यू झाला आहे. तर तीन हजारांहून अधिक जण बेपत्ता आहेत. पुरात मृत्युमुखी पडलेल्या आणि तातडीने ओळख पटू न शकलेल्या व्यक्तींची ओळख भविष्यात पटवता यावी, यासाठी प्रशासन डीएनए नमुने (DNA) आणि इतर ओळखविषयक माहिती जतन करणार आहे. नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह (Balen Shah) यांनी ही माहिती दिली आहे.

तिबेटच्या सीमेवरील हिमालयीन भागात आलेल्या भीषण पुरानंतर जवळपास 3 हजार नागरिक बेपत्ता आहेत. या नैसर्गिक आपत्तीत नेपाळ आणि तिबेटमध्ये 680 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. नेपाळमध्ये सुमारे 2 हजार 426 तर तिबेटमधील ग्यिरॉन्ग काउंटीमध्ये 546 जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. बेपत्ता नागरिकांमध्ये 540 परदेशी नागरिकांचा समावेश आहे. हिमनदी कोसळल्यानंतर मोठ्या प्रमाणात दगड, बर्फ, चिखल आणि मलबा नदीच्या प्रवाहातून वाहत आला. या पुराच्या तडाख्यात अनेक गावे उद्ध्वस्त झाली असून इमारती, पूल आणि वीजपुरवठ्याच्या पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात नष्ट झाल्या आहेत.


दफन करण्यापूर्वी DNA नमुने घेणार

बचाव पथकांना सापडलेल्या काही मृतदेहांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. त्यांची ओळख पटवणे कठीण झाले आहे. आरोग्याचा धोका आणि संभाव्य रोगराईचा फैलाव टाळण्यासाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून अशा मृतदेहांचे सरकारी पातळीवर दफन केले जाणार आहे. पंतप्रधान शाह यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे बचाव आणि मदतकार्याची माहिती देताना सांगितले की, तातडीने ओळख पटू न शकलेल्या मृतदेहांवर अज्ञात आणि बेवारस मृतदेहांसाठी असलेल्या सरकारी मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रक्रिया केली जाईल.
मात्र, मृतदेह दफन करण्यापूर्वी त्यांचे डीएनए नमुने आणि ओळख पटविण्यासाठी आवश्यक इतर माहिती जतन केली जाणार आहे. चितवन जिल्हा प्रशासनाने जारी केलेल्या सूचनेनुसार, डीएनएनमुने घेतल्यानंतर मृतदेह मोकळ्या जागेत दफन केले जातील. ज्या मृतदेहांची ओळख त्यांच्या कुटुंबीयांनी पटवली आहे, ते मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात येत आहे. या प्रक्रियेमुळे मृतदेहाची अवस्था ओळख पटवण्यास योग्य नसली तरी भविष्यात डीएनए किंवा इतर उपलब्ध माहितीच्या आधारे मृतांची ओळख पटवणे शक्य होणार आहे.


कुटुंबीयांकडून बेपत्ता नातेवाईकांचा शोध

काठमांडूमध्ये बेपत्ता नागरिकांच्या नातेवाईकांनी महाराजगंज मेडिकल कॅम्पसच्या बाहेर गर्दी केली होती. काही मृतदेह येथे आणण्यात आले आहेत. आपल्या नातेवाईकांची ओळख पटते का, यासाठी कुटुंबीय प्रवेशद्वार आणि परिसरातील भिंतींवर लावण्यात आलेली छायाचित्रे पाहत आहेत. या आपत्तीमुळे परदेशातील कुटुंबीयांनाही आपल्या नातेवाईकांच्या माहितीची प्रतीक्षा आहे.

नाथाभाऊंच्या मनात दडलं काय? राजकीय प्रवासाच्या आठवणींना उजाळा; अमृत महोत्सवात खडसेंच्या भावनांचा बांध फुटला

हवामान सुधारल्यानंतर बचावकार्य पुन्हा सुरू
नेपाळमध्ये पाऊस आणि धुक्यामुळे काही काळ थांबलेले शोध आणि बचावकार्य शनिवारी दुपारनंतर पुन्हा सुरू करण्यात आले. सर्वाधिक प्रभावित झालेल्या रसुवा जिल्ह्यातील एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, हवामानात काहीशी सुधारणा झाल्यानंतर हेलिकॉप्टरची उड्डाणे सुरू झाली असून बचावकार्य पुन्हा सुरू करण्यात आले आहे. नेपाळ-चीन सीमेवर तयार झालेले एक सरोवर ओसंडून ल्हेंडे खोला आणि त्रिशूली नदीमध्ये पाणी आल्याने शुक्रवारीही बचावकार्य थांबवावे लागले होते. शनिवारी परिस्थितीत काहीशी सुधारणा झाली. चिनी अधिकारी आणि सरकारी प्रसारमाध्यम सीसीटीव्हीनुसार, सरोवराच्या तळाचा काही भाग दिसू लागला आहे. उपग्रह छायाचित्रांवरूनही सरोवरातील पाण्याची पातळी कमी होत असल्याचे दिसून आले.नेपाळकडून वरच्या भागातील दोन सरोवरांवर लक्ष ठेवण्यात येत असून, दोन्ही सरोवरांतील पाणी पूर्णपणे ओसरत नाही तोपर्यंत पुराचा धोका कायम राहणार असल्याचा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे.


‘भाजप उभी केली नाथाभाऊ आणि प्रमोद महाजनांनी’ एकनाथ खडसेंच्या अमृत महोत्सवात शरद पवारांचं मोठं विधान


नेपाळकडून तज्ज्ञांची मदत मागवली

बचाव, पूनर्वसन आणि मृतदेहांची ओळख पटवण्याच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नेपाळने आंतरराष्ट्रीय स्तरावर तज्ज्ञांची मदत मागितली आहे. परराष्ट्रमंत्री शिशिर खानाल यांनी सांगितले की, बोगद्यांमध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढणे, उद्ध्वस्त पुलांमुळे खंडित झालेली वाहतूक व दळणवळण व्यवस्था पूर्ववत करणे, मृतदेहांची ओळख पटवणे, डीएनए चाचण्या करणे आणि मृतदेह दीर्घकाळ सुरक्षित ठेवण्यासाठी नेपाळला तांत्रिक मदतीची आवश्यकता आहे. शनिवारी भारतीय बोगदा तज्ज्ञांचे पथक नेपाळमध्ये दाखल झाले. चीननेही बचावकार्यासाठी बोगदा तज्ज्ञांची टीम पाठवली आहे.

पुनर्बांधणीसाठी अब्जावधी डॉलरचा खर्च
या भीषण आपत्तीमुळे नेपाळसमोर आता मोठे पुनर्बांधणीचे आव्हान उभे राहिले आहे. अर्थमंत्री स्वर्णिम वाग्ले यांनी Reuters ला दिलेल्या माहितीनुसार प्राथमिक अंदाजानुसार पुनर्बांधणीसाठी 4 ते 5 अब्ज डॉलर खर्च येऊ शकतो. मात्र, नुकसानीचे संपूर्ण मूल्यांकन अद्याप सुरू असल्याने अंतिम आकडा यापेक्षा वेगळा असू शकतो.

follow us