Ali Sabary On India : श्रीलंकेला ( Shrilanka ) स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा आपल्या सर्वात वाईट काळाचा सामना केला. देशाची आर्थिक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. एवढेच नाही तर सामान्य जनतेच्या मुलभूत गरजा देखील ते पूर्ण करु शकलेले नाहीत. पेट्रोल-डिझेलपासून ते अगदी दूध व खाद्यपदार्थ देखील इतके महाग झाले की लोक त्यांना खरेदी देखील करु शकत नव्हते. अशा परिस्थितीत श्रीलंकेला मदत करण्यासाठी भारत देश पुढे आला होता.
यावरुन श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री अली साबरी ( Ali Sabary ) यांनी भारताचे आभार मानले आहेत. त्यांनी एका पॉडकास्टमध्ये यासंबंधीच्या भावना व्यक्त केल्या आहेत. भारताच्या सरकारने आम्हाला आर्थिस संकटातून बाहेर पडण्यासाठी अत्यंत धाडसी निर्णय घेतले. भारताचे सरकारच नाही तर भारतीय जनता देखील आम्हाला मदत करण्यासाठी पुढे आली होती. ही एक ऐतिहासिक घटना होती. यासाठी भारताचे आम्ही ऋणी आहोत, असे साबरी म्हणाले आहेत. तसेच भारत हा आमचा खरा मित्र असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.
यावेळी अली साबरी हे आयडियाज पॉड या कार्यक्रमात बोलत होते. भारत देशाने कोणत्याही अन्य देशाच्या तुलनेमध्ये श्रीलंकेला अधिकची मदत केली आहे. विशेष म्हणजे जेव्हा आम्हाला त्याची मदत होती तेव्हा भारताने आम्हाला मदत केली आहे, असे साबरी म्हणाले आहेत.
वाईट काळ आल्यावर तुम्हाला तुमच्या मित्रांची परीक्षा कळते. वास्तवात व मदतीच्या वेळी भारत आमच्या पाठीशी उभा राहिला. त्यामुळे भारताने आमच्यासाठी जे काही केले त्यासाठी आम्ही भारताचे आभारी आहोत, असे साबरींनी सांगितले.