Download App

जगातील सर्वात लांब नदी क्रूझ ‘एमव्ही गंगा विलास’ प्रवासासाठी सज्ज

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील वाराणसीच्या रामनगर बंदरावरुन एमव्ही गंगा विलास ही क्रूझ बांग्लादेशमार्गे आसाममधील दिब्रुगढपर्यंत तीन हजार 200 किमीचा प्रवास करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या जगातील सर्वात लांब अंतराच्या नदीतील क्रूझला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.

आज सकाळी 10 : 30 च्या सुमारास पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. तसेच वाराणसीतील गंगा नदीच्या किनाऱ्यावरील ‘टेंट सिटी’चे उद्घाटनही पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

या क्रूझमध्ये ५ स्टार हॉटेलसारख्या सुविधा आहेत. यामध्ये रेस्टॉरंट, सनडेक, जिम, बार, स्पा आणि लाउंजचा समावेश आहे. तसेच मेन डेकवरील ४० सीटच्या रेस्टॉरंटमध्ये कॉन्टिनेंटल आणि भारतीय खाद्यपदार्थांसह बुफे काउंटर आहे. तर वरच्या डेकच्या बाहेर स्टीमर खुर्च्या आणि कॉफी टेबल ठेवण्यात आले आहे.

याबरोबच एलईडी टीव्ही, तिजोरी, स्मोक अलार्म, लाइफ वेस्ट आणि स्प्रिंकलर असलेली बाथरूम देखील या क्रूझमध्ये बनवण्यात आली आहे. ‘एमव्ही गंगा विलास’ ही क्रूझ ६२.५ मीटर लांब आणि १२.८ मीटर रुंद आहे. तसेच या क्रूझमध्ये ४० हजार लिटरची इंधन टाकी आणि ६० हजार लिटरची पाण्याची टाकी बसवण्यात आली आहे.

ही क्रूझ नदीतून १० ते १२ किलोमीटर प्रतितास वेगाने प्रवास करेन. १३ जानेवारी रोजी वाराणसीवरून निघालेली ही क्रूझ १ मार्च रोजी आसाममध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. या दरम्यान ती गंगा, हुगळी, विद्यावती, भागीरथी, मातला, पद्मा, जमुना आणि ब्रह्मपुत्रा या नदीतून प्रवास करणार आहे.

दरम्यान, ५१ दिवसांची ही जलयात्रा देशाच्या सांस्कृतिक मुळांशी जोडण्याची व त्याच्या विविधतेच्या सुंदर पैलूंचा शोध लावण्याची अद्वितीय संधी देणार असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी काही दिवसांपूर्वी दिलीय.

Tags

follow us