Download App

बलूचिस्तान, खैबर पख्तूनख्वा अन् LOC.. तिन्ही बाजूंनी घेरलाय पाकिस्तान

सध्या संपूर्ण पाकिस्तानात खळबळ उडालेली आहे. भारत आपल्यावर कधीही हल्ला करू शकतो अशी भिती पाकिस्तानी राज्यकर्त्यांना वाटत आहे.

Pakistan News : पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निष्पाप 27 भारतीयांचा (Pahalgam Terror Attack) मृत्यू झाला. दहशतवाद्यांनी त्यांचा धर्म विचारून पर्यटक हिंदू असल्याची खात्री करून त्यांच्यावर अंदाधुंद गोळ्या झाडल्या. यानंतर संपूर्ण भारतात संतापाची लाट उसळली आहे. पाकिस्तानला धडा (Pakistan) शिकवण्याची मागणी होत आहे. यानंतर भारत सरकारने सुद्धा पाकिस्तान विरुद्ध कठोर निर्णय घेतले आहेत. तर पाकिस्तानने सुद्धा भारताला पोकळ धमक्या देण्याचे (India Pakistan Tension) उद्योग सुरू केले आहेत.

पण सध्या संपूर्ण पाकिस्तानात खळबळ उडालेली आहे. भारत आपल्यावर कधीही हल्ला करू शकतो अशी भिती पाकिस्तानी राज्यकर्त्यांना वाटत आहे. यातच बलुच लिबरेशन आर्मीने (Baloch Liberation Army) त्यांचे टेन्शन आणखी वाढवले आहे. त्यामुळे पाकिस्तान आता फक्त भारताकडूनच नाही तर तिन्ही बाजूंनी घेरला गेला आहे.

भारतीय सैन्याने बदला (Indian Army) घेण्याची पूर्ण तयारी केली आहे. कोणत्याही क्षणी पाकिस्तान विरुद्ध कारवाई सुरू केली जाऊ शकते अशी शक्यता व्यक्त होत आहे. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीबद्दल सांगायचं झालं तर बीएलएने (BLA) कालच आयईडी स्फोट करून पाकिस्तानचे दहा सैनिक मारले. बलुच आर्मीचे संकट असताना खैबर प्रांतात टीटीपीने (TTP) धमकी दिली आहे की आम्ही उत्तरेकडून पाकिस्तानचे तुकडे करू शकतो. अशा प्रकारे पाकिस्तान आता तीन बाजूंनी घेरला गेला आहे.

BLA चे हल्ले वाढले

पाकिस्तानी सैन्यासमोर बलुच लिबरेशन आर्मीचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. बलुच आर्मीने पूर्ण प्लॅनिंग करून पाकिस्तान आर्मीवर (Pakistan Army) हल्ला केला. पाकिस्तानी सैन्याच्या ताफ्यात तीन गाड्या चालल्या होत्या. पुढच्याच क्षणी जोरदार स्फोट झाला. या स्फोटात दहा सैनिक ठार झाले. यामध्ये पाकिस्तान सैन्यातील तीन मोठ्या अधिकाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती आहे.

प्रजेचे रक्षण करणे हे राजाचे कर्तव्य, दहशतवाद्यांना धडा शिकवावा; मोहन भागवतांची स्पष्ट भूमिका

मागील काही वर्षांपासून बलुच आर्मीने पाकिस्तानी सैन्याला टार्गेट केले आहे. बलूच आर्मीचे हल्ले इतके प्लॅनिंग करून केलेले असतात की पाकिस्तानी सैन्याला काहीच करता येत नाही. या हल्ल्यांनी सैन्य हैराण झालेले असताना जर भारताशी युद्ध झाले तर पाकिस्तानची अतिशय वाईट अवस्था होणार यात काहीच शंका नाही.

तीन आघाड्यांवर लढणे अशक्य

पाकिस्तानचे आर्मी चीफ असीम मुनीर यांनीही स्पष्टपणे सांगितले होते की तिन्ही आघाड्यांवर सैन्य लढू शकत नाही. बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वामध्ये पाकिस्तानची पूर्ण नाचक्की झाली आहे. अशात जर भारताविरुद्ध लढण्यासाठी येथून सैन्य काढून घेतले तर बलुचिस्तानला स्वातंत्र्य मिळण्याचा मार्ग देखील मोकळा होईल. दुसरीकडे टीटीपीने दिलेल्या धमकीनेही शाहबाज आणि मुनीर काळजीत पडले आहेत. परंतु, त्यांच्याकडून काहीच कार्यवाही होत नाही ही वस्तूस्थिती आहे. कारण पाकिस्तानी सैन्यात त्यांच्याविरुद्ध उघड बंडखोरी आहे.

अशा परिस्थितीत पाकिस्तान सरकारमधील मंत्र्यांत भीती स्पष्ट दिसत आहे. जानेवारी महिन्यात बीएलएच्या हल्ल्यात 43 पाकिस्तानी सैनिक मारले गेले होते. फेब्रुवारीत 18 सैनिकांचा बळी गेला होता. 12 मार्चला तर बीएलएच्या बंडखोरांनी अख्खी रेल्वेच हायजॅक केली होती. यात 200 पेक्षा जास्त सैनिकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. यानंतर क्वेटा शहराजवळ झालेल्या हल्ल्यात 90 पाकिस्तानी सैनिक मारले गेले. दोन दिवसांपूर्वी बलोच आर्मीने सात पाकिस्तानी सैनिकांना ठार केले.

याच प्रकारे टीटीपीनेही पाकिस्तान विरुद्ध युद्ध पुकारले आहे. त्यामुळे पाकिस्तानचे आता लवकरच तुकडे होतील अशी चिन्हे दिसत आहेत. भारताविरुद्ध जर युद्ध झालं तर यात पाकिस्तानचा पराभव निश्चित आहे. यातच जर बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वा वेगळे झाले तर आश्चर्य वाटायला नको. पाकिस्तानी सैन्य आणि सरकारमधील मंत्र्यांनाही या गोष्टीची जाणीव आहे. जर भारताने युद्धात उडी घेतली तर पाकिस्तानची अवस्था अतिशय वाईट होईल एवढे मात्र नक्की.

भारताच्या कारवाईची ‘TRF’ला धडकी, मारली पलटी; पहलगाम हल्ल्याची जबाबदारी नाकारली

follow us