जर तुम्ही पुण्या-मुंबई सारख्या शहरात राहत असाल तर तुम्हाला ट्रॅफिकचा प्रॉब्लेम काही नवा नाही. या ट्रॅफिकच्या प्रॉब्लेममुळे लाखो लोकांचा कितीतरी वेळ वाया जातो. हे तुम्हाला माहित असेलच पण याच विषयावर एका जागतिक संस्थेने एक रिसर्च प्रकाशित केला आहे. या रिपोर्टमध्ये नक्की काय म्हटलं आहे? भारतातल्या कोणत्या शहरामध्ये सर्वाधिक ट्रॅफिक आहे याला किती वेळ लागतो.
जगातील सर्वच मोठ्या शहरांमध्ये वाढती ट्रॅफिक ही सर्वांचीच समस्या बनली आहे. जगभरातील प्रत्येक मोठ्या शहरात वाहनांची संख्या एवढी वाढली आहे की, थोडंफार अंतर कापण्यासाठी खूप वेळ लागतो. टॉम-टॉम या डॅनिश संस्थेने याबाबतचा एक रिपोर्ट पब्लिश केला आहे. ज्याला ट्रॅफिक इंडेक्स 2022 असे नाव देण्यात आले आहे. या संस्थेने जगभरातील सुमारे ६ खंडातील ५६ देशांमधील ३८९ शहरांचा अभ्यास केला असून त्यातील वाहतुकीचा डेटा गोळा केला.
या रिपोर्ट मध्ये टॉम-टॉम संस्थेने जगभरातील शहरातील ट्रॅफिक, सर्वाधिक ट्रॅफिकची शहरे, तिथे सरासरी १० किलोमीटरसाठी लागणारा वेळ आणि सरासरी स्पीड याची माहिती त्यांनी या रिपोर्ट मध्ये प्रकाशित केली आहे.
या रिपोर्टनुसार इंग्लडमधील लंडन जगातील सर्वाधिक ट्रॅफिक आणि गर्दी असलेल्या शहरात क्रमांक १ वर आहे. लंडन मध्ये वाहतूक इतकी प्रचंड आहे की लंडनमध्ये १० किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी सरासरी ३६ मिनिटे २० सेकंद लागतात. लंडनमध्ये सरासरी वेग 14 किलोमीटर प्रति तास आहे.
तर याच रिपोर्टनुसार बेंगलोर दुसऱ्या क्रमांकावर आणि तिसऱ्या क्रमांकावर आयर्लंडचे डब्लिन शहर आहे. या शहरात १० किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी २८ मिनिटे ३० सेकंद लागतात. त्यापाठोपाठ जपानमधील सपोरो, इटलीतील मिलान, भारतातील पुणे, रोमानियामधील बुखारेस्ट, पेरूमधील लिमा, फिलीपिन्समधील मनिला आणि कोलंबियामधील बोगोटा यांचा क्रमांक लागतो.
टॉम-टॉमच्या या रिपोर्टमध्ये भारतातील शहरांचा देखील समावेश आहे. देशातील सर्वाधिक वाहतूक असलेल्या टॉप १० शहरांमध्ये दोन शहरांचा समावेश आहे. देशातील बेंगलोर दुसऱ्या क्रमांकावर आणि पुणे हे सहाव्या क्रमांकावर आहे.
बेंगलोरमध्ये सरासरी १० किलोमीटर अंतर कापण्यासाठी एका व्यक्तीला २९ मिनिटे १० सेकंद लागतात. तर बंगळुरूमध्ये वाहनांचा सरासरी वेग ताशी १८ किलोमीटर आहे. आणि पुण्यात १० किलोमीटर अंतर कापण्यासाठी २७ मिनिटे २० सेकंद लागतात. तर पुण्यात सरासरी वेग ताशी १८ किमी आहे.
बेंगलोर आणि पुण्याशिवाय देशातील इतर अनेक शहरांचा या यादीत समावेश आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर बेंगळुरू आणि सहाव्या क्रमांकावर पुण्यानंतर, नवी दिल्ली ३४ व्या क्रमांकावर आहे. दिल्लीतही १० किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी सरासरी २२ मिनिटे १० सेकंद लागतात आणि येथे सरासरी वेग २४ किलोमीटर प्रति तास आहे. दिल्लीनंतर मुंबई ४७ व्या क्रमांकावर आहे.