Tree Number Per Person : भारतात प्रति व्यक्ती वृक्षांची संख्या कमी झाली आहे. जगाचा विचार केला तर येथे प्रति व्यक्ती झाडांची संख्या सरासरी 400 इतकी आहे. भारतात ही संख्या प्रचंड खालावली आहे. या बाबतीत पाकिस्तानची परिस्थिती तर यापेक्षाही वाईट आहे. वृक्ष आपल्यासाठी किती आवश्यक आहेत याची माहिती सगळ्यांनाच आहे. आपल्या अवतीभोवती आपल्याला झाडे दिसतात मात्र तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की आपल्याला आवश्यकता आहे तितकी झाडे या जगात उरली आहेत का. खरंतर जगात असे काही देश आहेत जिथे प्रति व्यक्ती एकही झाड शिल्लक राहिलेले नाही. काळजीची गोष्ट म्हणजे आपला भारतही याच दिशेने मार्गक्रमण करत आहे. भारतात प्रति व्यक्ती किती झाडे आहेत आणि जगात भारताची काय स्थिती आहे याची माहिती जाणून घेऊ या..
काही वर्षांपूर्वीच्या एका संशोधनात असे समोर आले होते की पृथ्वीवर तीन ट्रिलियन वृक्ष आहेत. यामध्ये जंगलातील वृक्षांचाही समावेश होता. आता या संख्येचा विचार करून अंदाज लावला तर प्रति व्यक्ती 400 झाडे होतात. याबाबतीत काही देशांची स्थिती अतिशय खराब आहे तर काही देशांत मात्र खूप जास्त झाडे आहेत. एकट्या दक्षिण अमेरिकेतील जंगलात पृथ्वीच्या 15 ते 20 टक्के झाडे आहेत. कॅनडा आणि आसपासच्या परिसरात रोपांची संख्या खूप जास्त आहे.
धक्कादायक! फक्त दिल्लीच नाही जगातील ‘या’ शहरांनाही पाण्याच्या दुष्काळाचा धोका
जगात प्रति व्यक्ती सर्वाधिक वृक्ष कॅनडात आहेत. रिपोर्ट नुसार कॅनडात प्रति व्यक्ती नऊ हजार वृक्ष आहेत. इतक्या मोठ्या संख्येने वृक्ष असल्याने येथील जलवायु परिस्थिती नेहमीच नियंत्रणात राहते. कॅनडासह उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका या दोन्ही खंडांतील देशात वृक्षांची संख्या जास्त आहे. तसेच येथे वृक्षतोडही मोठ्या प्रमाणात होते.
जगात असेही देश आहेत जिथे प्रति व्यक्ती एकही झाड नाही. जॉर्डन, यूएई मध्ये प्रति व्यक्ती एकही झाड नाही. उझबेकिस्तान मध्ये प्रति व्यक्ती चार झाडे, अफगाणिस्तानमध्ये 12 तर इराकमध्ये प्रति व्यक्ती 15 झाडे शिल्लक राहिले आहेत. पाकिस्तानात तर प्रति व्यक्ती झाडांची संख्या अतिशय कमी झाली आहे. रिपोर्ट मध्ये दिलेल्या माहितीनुसार येथे प्रति व्यक्ती फक्त 5 रोपे आहेत.
भारताचा विचार केला तर भारतात प्रति व्यक्ती 28 झाडे आहेत. भारतात झाडांची संख्या वाढणे जास्त महत्वाचे आहे. जर हे शक्य झाले तर भारतातही हवामान बदलांना नियंत्रित करता येऊ शकते. इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्टच्या रिपोर्टनुसार सध्या भारतात 7 लाख 13 हजार 789 चौरस किलोमीटर क्षेत्र वनाच्छादित आहे. सन 2019 ते 2021 या काळात वनाच्छादित क्षेत्र 1540 चौरस किलोमीटरने वाढले आहे.