Donald Trump News : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर (Donald Trump) अमेरिकेने यमनच्या हुती बंडखोरांवर हल्ल्यांना सुरुवात केली आहे. लाल समुद्रात हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यात येईल असा इशारा ट्रम्प यांनी दिला होता. यानंतर अमेरिकी सैन्याने हुतींवर हल्ले सुरू केले. या हल्ल्यांत आतापर्यंत 19 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.
गाझा पट्टीतील लोकांना मदत थांबवण्यात आली होती. याचा विरोध म्हणून हुती बंडखोरांनी लाल समुद्रात इस्त्रायलच्या जहाजांवर हल्ले सुरू केले होते. इस्त्रायलने मागील तीन आठवड्यांपासून गाझात कोणत्याही मदतीला परवानगी दिलेली नाही. यामुळे गाझातील जवळपास वीस लाख लोकांसमोर उपासमारीचे संकट निर्माण झाले आहे. जर ही बंदी उठवण्यात आली नाही तर लाल समुद्रात हल्ले करू अशी धमकी हुती अतिरेक्यांनी दिली होती. यानंतर ट्रम्प यांनीही हल्ले थांबवले नाही तर कठोर प्रत्युत्तराचा इशारा दिला होता.
Houthi Attacks : हुती बंडखोरांची घटका भरली; अमेरिकेचा अखेरचा इशारा, सैन्यही अलर्ट
याआधी डिसेंबर महिन्यात हुती बंडखोरांनी लाल समुद्रात शेवटचा हल्ला केला होता. गाझा युद्धविरामानंतर हुतींनी हल्ले थांबवले होते. परंतु, नंतर हुतींनी पुन्हा डोके वर काढले. या हल्ल्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अमेरिकेने प्रति हल्ले सुरू केले आहेत. हल्ले लवकर थांबणार नाहीत. हल्ले दीर्घकाळ सुरुच राहतील असे संकेत व्हाइट हाऊस प्रशासनाने दिले आहेत.
व्हाइट हाऊसच्या प्रेसनोटमध्ये म्हटले आहे की हल्ल्यांच्या आधी साधारण 25 हजार जहाजे दरवर्षी लाल समुद्रामार्गे जात होती. परंतु, यात घट होऊन ही संख्या फक्त 10 हजार राहिली आहे. 2023 पासून आतापर्यंत अमेरिकेच्या 145 व्यापारी जहाजांवर या भागात हल्ले झाले आहेत. शेवटचा हल्ला डिसेंबर महिन्यात झाला होता. डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेण्याआधी हा हल्ला झाला होता.
दुसरीकडे गाझात युद्धविरामानंतरही इस्त्रायलने हल्ले थांबवलेले नाहीत. हमासकडून या हल्ल्यांना युद्धविरामाचे उल्लंघन म्हटले जात आहे. परंतु, हमासच्या ताब्यात असलेल्या बंधकांची सुटका व्हावी यासाठी हमासवर आणखी दबाव टाकण्यासाठी गाझात मर्यादीत स्वरुपात सैन्य कारवाईचे संकेत इ्स्त्रायलने दिले आहेत. त्यामुळे हे युद्ध आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
अखेर गाझा युद्ध संपलं! लवकरच होणार युद्धविराम; वाचा इस्त्रायल-हमास युद्धाची टाइमलाइन