इराणमध्ये हिंसाचार वाढला असून येथे सुरु असलेल्या (Iran) निदर्शनांमध्ये आत्तापर्यंत सुरक्षा कर्मचाऱ्यांसह २००० लोकांचा मृत्यू झाला आहे. देशभरातील निदर्शनांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात मृतांची संख्या इराणी अधिकाऱ्यांनी पहिल्यांदाच मान्य केली आहे. या मृतांमध्ये सामान्य नागरिक किती आहेत आणि सुरक्षा दलांचे जवान किती आहेत हे स्पष्ट करण्यात आलेलं नाही.
रॉयटर्स या वृत्तसंस्थेशी बोलताना इराणच्या अधिकाऱ्याने सांगितलं की ज्यांना आम्ही दहशतवादी मानतो अशा लोकांच्या कारवायांमुळे ही परिस्थिती ओढवली आहे. मागच्या वर्षी इस्रायल आणि अमेरिका यांच्या हल्ल्यानंतर देशावरचा दबाव वाढला आणि इराण हा देश आर्थिकदृष्ट्या डबघाईला आला. त्यामुळे इराणी अधिकाऱ्यांसमोर आता तीन वर्षांमधलं सर्वात मोठं अंतर्गत आव्हान उभं राहिलं आहे.
इराणमध्ये जनतेचा तीव्र आक्रोश; हिंसक आंदोलनात झालेल्या गोळीबारात तब्बल 538 आंदोलकांचा मृत्यू
रॉयटर्सच्या वृत्तानुसार इराणी अधिकाऱ्यांनी या मृत्यूंसाठी दहशतवादी वृत्तीचे लोक जबाबदार आहेत. तसंच इराणमध्ये महागाई प्रचंड वाढली आहे आणि देश आर्थिक डबघाईला आला आहे. त्यामुळे खामेनईंच्या विरोधात विद्रोह झाला. इराणमध्ये १९७९ च्या इस्लामिक क्रांतीपासून सत्तेत असलेल्या धार्मिक अधिकाऱ्यांनी निदर्शनांवर दुहेरी दृष्टिकोन स्वीकारला आहे. आर्थिक समस्यांवरुन समर्थन तर कारवाई अशी दुटप्पी भूमिका यात दिसून येते. दरम्यान अमेरिका आणि इस्रायलवर अशांतता भडकवल्याचा आरोप आहे.
एका मानवाधिकार गटाने शेकडो मृत्यू आणि हजारोंना अटक झाल्याची माहिती दिली होती. मात्र त्यानंतर इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्या. त्यामुळे माहिती मिळण्यात खंड पडला. दरम्यान, इराणमध्ये सुरु असलेल्या निदर्शनांमध्ये सुरक्षा कर्मचाऱ्यांसह सुमारे २ हजार लोकांचा मृत्यू झाल्याची कबुली इराणच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. यासाठी दहशतवाद्यांना जबाबदार धरण्यात आलं आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी परदेशातील अधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीत एक दावा केला आहे, की आमच्याकडे काही पुरावे आहेत ज्यावरुन आम्ही हा दावा करु शकतो की आमच्या देशातील अशांतीच्या मागे अमेरिका आणि इस्रायलचा हात आहे.
