Download App

चीनकडे झुकलेल्या श्रीलंकेत भारताचे मोठे प्रोजेक्ट; दिसानायकेंच्या दौऱ्याने समीकरणं बदलणार?

India Sri Lanka Realtion : हिंद महासागरात स्थित श्रीलंका एक महत्त्वाचा देश आहे. बंदरांमुळे प्राचीन काळी हा देश सिल्क रुटचा महत्त्वाचा (India Sri Lanka Reation) घटक राहिला आहे. फक्त अडीच कोटी लोकसंख्या असणारा श्रीलंका भौगोलिक स्थितीमुळे भारत आणि चीन दोघांसाठी (India China) महत्त्वाचा आहे. सध्या श्रीलंकेत डाव्या विचारसरणीचे आणि चीनशी जवळीक असणारे अनुरा दिसानायके सत्तेत (Anura Kumara Dissanayake) असले तरी त्यांनी आपल्या पहिल्या विदेश यात्रेसाठी भारताची निवड करून एक स्पष्ट संदेश दिला आहे. त्यांचा हा निर्णय चीनसाठी धक्कादायक मानला जात आहे. कारण भारता इतकाच चीनसाठी श्रीलंका महत्त्वाचा आहे.

परिस्थिती कशीही असो दोन्ही देश श्रीलंकेबरोबर संबंध चांगले ठेवू इच्छितात. चीन श्रीलंकेला भारताच्या विरुद्ध वापर करण्याचा प्रयत्न करत आहे तर दुसरीकडे भारत समुद्री सुरक्षा आणि शेजारी प्रथम या नितीनुसार श्रीलंकेला दूर करू इच्छित नाही. याच कारणामुळे श्रीलंकेत भारत आणि चीनचे अनेक प्रकल्प पणाला लागले आहेत.

भारताचे श्रीलंकेत मोठे प्रकल्प

भारत श्रीलंकेत अनेक मोठ्या प्रकल्पांवर काम करत आहे. तसेच दिसानायके यांच्या भारत दौऱ्यात अनेक प्रकल्पांत पुढील कार्यवाही करण्याच्या दिशेने निर्णय होऊ शकतात. भारत श्रीलंकेत हाउसिंग प्रोजेक्ट मध्ये देखील काम करत आहे. या प्रकल्पाशी संबंधित फेज 3 आणि फेज 4 चे काम पूर्ण होणार आहे. या व्यतिरिक्त तीन हायब्रीड रीन्यूएबल एनर्जी प्रोजेक्ट आणि कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोजेक्टही सुरू आहेत.

तीव्र विरोध अन् संताप..फक्त सहाच तासांत दक्षिण कोरियाने मागे घेतला मार्शल लॉ

दोन्ही देशांत 5 बिलियन डॉलर्सचे रोड, रेल्वे लिंक परियोजना यांवर चर्चा सुरू आहे. श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. भारत श्रीलंकेतील पॉवर प्लांटसाठी एलएनजी पुरवठा करणार आहेत. भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन मोठ्या प्रकल्पांचा विचार केला तर डायरेक्ट कनेक्टिव्हिटी हा प्रकल्प आहे.

या अंतर्गत दोन्ही देशांदरम्यान समुद्रात एक पूल तयार करण्यात येणार आहे. या पुलाचे स्ट्रक्चर कसे असेल याचा निर्णय अद्याप झालेला नाही. दुसरा मोठा प्रकल्प म्हणजे श्रीलंकेतील वीज पुरवठा क्षेत्राला भारताच्या पॉवर ग्रीडला जोडणे हा आहे. दोन्ही देशांत गॅस आणि तेल पुरवठा करण्यासाठी पाइपलाइन तयार करण्याचा तिसरा मोठा प्रकल्प आहे.

चीनचा मक्तेदारीचा प्रयत्न

श्रीलंकेवर चीनचे मोठे कर्ज आहे. एक प्रकारे श्रीलंका चीनच्या कर्जाच्या सापळ्यात अडकला आहे. सन २००६ ते २०१९ या काळात श्रीलंकेतील मुलभूत सुविधांच्या प्रकल्पांत चीनने तब्बल १२ बिलियन डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. दुसरीकडे भारताने आर्थिक संकटाच्या काळात श्रीलंकेला मोठी मदत दिली आहे. भारत सरकारने आतापर्यंत ५ बिलियन डॉलर्सची लाइन ऑफ क्रेडिट आणि ग्रँट दिली आहे.

चीनमध्ये सापडला सोन्याचा मोठा साठा, आफ्रिकेलाही पछाडलं; किंमत ऐकून व्हाल थक्क!

चीनच्या महत्वाच्या प्रोजेक्ट्समध्ये हंबनटोटा बंदराचे निर्माणाचा समावेश आहे. या बंदराचा विकास चीनने केला आहे. या बंदरासाठी श्रीलंका सरकारने चायना एक्स एम बँकेकडून १.२ बिलियन अमेरिकी डॉलर्स उधार घेतले होते. यानंतर सन २०१७ मध्ये श्रीलंकेने हे बंदर ९९ वर्षांच्या करारावर चीनला सोपवले होते.

आता चीन हंबनटोटा सारखेच आणखी एक बंदर तयार करण्यावर विचार करत आहे. तसेच कोलंबोच्या बाहेर रियल इस्टेट परियोजना आणि एक रडार बेस स्थापित करण्याचीही योजना आखली जात आहे. या रडार बेसच्या माध्यमातून चीन भारतीय नौसेनेच्या हालचालींवर आणि तामिळनाडूतील दोन अणुऊर्जा संयंत्रांवर नजर ठेऊ शकणार आहे.

बीआरआय प्रोजेक्टमध्ये श्रीलंकेचा समावेश

चीन सध्या श्रीलंकेची राजधानी कोलंबो शहरात कोलंबो पोर्ट सिटी तयार करत आहे. २०१४ मध्ये या प्रकल्पाला सुरुवात झाली होती. सन २०४२ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन आहे. तसेच चीनच्या बेल्ट रोड अँड इनिशिएटिव्ह प्रोजेक्टमध्येही श्रीलंकेचा समावेश आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून चीन दोन नवीन व्यापारी मार्ग विकसित करत आहे. याअंतर्गत रेल्वे, बंदरे, हायवे आणि पाइपलाइनच्या नेटवर्कच्या माध्यमातून आफ्रिका आणि युरोपपर्यंत कनेक्टिविटी स्थापित करण्यात येणार आहे.

follow us